सिनेशौकीनांची चित्रपटगृहात गर्दी

दीर्घ प्रतीक्षेनंतर चित्रपटगृह मालकासह सेवकांनाही दिलासा
सिनेशौकीनांची चित्रपटगृहात गर्दी

मनमाड । बब्बू शेख Manmad

करोनाचा (corona) फटका इतर घटकांसोबतच चित्रपटगृहांना (Theaters) देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. करोना आटोक्यात आल्यानंतर मात्र गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले शहरातील जयश्री चित्रपटगृह पुन्हा सुरु झाले आहे.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चित्रपटगृह सुरु झाल्यामुळे सिनेशौकिनांना दिलासा मिळाला आणि त्यांनी चित्रपटगृहात झळकलेला ‘पुष्पा’ (pushpa) चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. गेल्या काही वर्षानंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाकडे वळल्याचे पाहून चित्रपटगृह चालकांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळात देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मनमाड (mandad) शहरात जयहिंद, अलंकार व जयश्री ही तीन चित्रपटगृहे होती. त्यापैकी जयहिंद चित्रपटगृह बंद होऊन त्याठिकाणी भव्य व्यापारी संकुल बांधले गेले तर तीन वर्षापूर्वी अचानक लागलेल्या आगीत अलंकार चित्रपटगृह (Theaters) जळून खाक झाले. आता शहरात ‘जयश्री’ हे एकमेव चित्रपटगृह शिल्लक राहिले आहे. या चित्रपटगृहात अप्पर क्लास 640 तर बाल्कनी 242 अशी आसन व्यवस्था असून बाल्कनी 60 रुपये तर अप्पर क्लास 50 रुपये तिकीटदर आहे.

देशात केबल आणि डिशटीव्हीचे (Cable and DishTV) आगमन झाल्यापासून लोकांना घरबसल्या स्वस्तात मनोरंजन कार्यक्रमांसोबत चित्रपट पहावयास मिळत असल्याने त्यांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक चित्रपटगृह बंद पडले तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मनमाडमधील (manmad) जयश्री चित्रपटगृह देखील याला अपवाद नाही.

प्रेक्षकांच्या उदासीनतेमुळे हे चित्रपटगृह देखील चालविणे अवघड झालेले असतांनाच इतर घटकांप्रमाणे करोनाचा फटका चित्रपटगृहांना देखील बसून गेल्या दोन वर्षापासून ते बंद होते. त्यामुळे चित्रपटगृह मालकाचे नुकसान तर होत होतेच शिवाय कर्मचार्‍यांवरही उपासमारीची वेळ आली होती. आता करोना काहीसा आटोक्यात आल्यानंतर जयश्री चित्रपटगृह पुन्हा सुरु होऊन त्यात पुष्पा हा चित्रपट झळकला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलीच गर्दी करीत आहेत. प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे वळू लागल्याचे पाहून चालकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

शासनाने घालून दिलेल्या करोनाच्या नियमांना अधीन राहून आम्ही चित्रपटगृह सुरु केले असून नियमांचे उल्लंघन होऊ नये, याची संपूर्ण दक्षता घेतली जात असल्याचे चित्रपटगृह व्यवस्थापक शंकर बोडखे यांनी सांगितले. केबलच्या माध्यमातून घरात बसून चित्रपट पहावयास मिळत असले तरी मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यात जो आनंद आणि मजा आहे; ती टीव्हीच्या छोट्या पडद्यावर चित्रपट पाहण्यात नसल्याचे मत सिनेशौकीनांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात पुर्ववैभव प्राप्त होवून चित्रपटगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा फलक लागेल, अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com