
मालेगाव | Malegaon
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना जिल्हा बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) भोपाळमधून (Bhopal) काल अटक केली होती. त्यांना आज मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हिरे यांच्यावर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Cooperative Bank) रेणूका सुत गिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर अद्वय हिरे यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेत जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत असताना ते भोपाळ येथे असल्याचे समजले. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३१ कोटी ४० लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज दाखवून कर्ज उचलल्याचा आरोप आहे.