नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2020 मध्ये यापुढील निकालासाठी एक चतुर्थांश नकारात्मक गुणपद्धती राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतरही रविवार (दि.21)झालेल्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवर मात्र नकारात्मक गुणपद्धती एक तृतीयांश अशी राहील, असा उल्लेख असल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

झालेल्या पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिकांची छपाई ही मार्च 2020 मधील असल्याने त्यावर जुन्या नियमाचा उल्लेख कायम राहिला. परंतु निकालामध्ये एक चतुर्थांश नकारात्मक गुणपद्धतीच अवलंबली जाणार आहे, अशी स्पष्टोक्ती आयोगाकडून देण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने 8 सप्टेंबर 2020ला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरिता नकारात्मक गुणांच्या अंमलबजावणी संदर्भात सुधारित कार्यपद्धती जाहीर केली.

यानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. म्हणजे, चार चुकीच्या उत्तरांसाठी एक गुण वजा केला जाईल. याआधी नकारात्मक गुणांचा नियम हा एक तृतीयांश असा होता. यामुळे तीन चुकीच्या उत्तरांसाठी एक गुण वजा केला जात असे. नकारात्मक गुणांसाठी सुधारित कार्यपद्धतीचे परिपत्र हे सप्टेंबर 2020 मध्ये जाहीर करण्यात आले.

21 मार्चला झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेवर 1/3 पद्धतीचा उल्लेख असला तरी निकालामध्ये नवीन पद्धती म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.