नाशिक । प्रतिनिधी Nashik

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयसाठी अर्ज करता येणार आहेत.

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येईल. एक जानेवारीपासून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे, प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रवेशप्रक्रियेसाठी चार जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. सरकारी व खासगी आयटीआयमधील प्रवेशप्रक्रिया ऑगस्टपासून सुरू आहे. प्रवेशाच्या नियमित चार फेर्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर समुपदेशन फेरी गुरुवारी संपली. याचदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

या परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी म्हणून शुक्रवारपासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरुवातीला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. एक ते चार जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. त्यानंतर पाच जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.