पदविकांचे दोनच फेर्‍यांमध्ये प्रवेश

प्रवेश
प्रवेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील एक फेरी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आता तीनऐवजी दोनच फेर्‍या घेतल्या जाणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे या बाबतचा अध्यादेश नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. पदविका प्रवेशांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, त्या संदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात पात्रता निकष, प्रवेश प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या पडताळणीबाबत स्वतंत्र आदेश प्रसिद्ध केले जातील.

या प्रक्रियेद्वारे दहावीनंतर पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. तर बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नोलॉजी या शाखांच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. अल्पसंख्याक महाविद्यालयांनाही दोन प्रवेश फेर्‍यांचा आदेश लागू असेल. अर्ज भरू न शकलेले, प्रवेश न मिळालेले, न घेतलेले अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात येईल. या अभ्यासक्रमांसाठी मराठा प्रवर्गासाठी जागा राखीव असतील.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबद्दलची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात काही बदल करण्यात आले आहेत. दहावी झालेले विद्यार्थी या प्रक्रियेसाठी पात्र असतील. तर यंदा तीनऐवजी दोनच फेर्‍यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. पुढील तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल, असे तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com