नाशिक

इगतपुरी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीवर लवकरच प्रशासकराज

नियुक्तीकडे लक्ष

Gokul Pawar

Gokul Pawar

घोटी । Ghoti

डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार की मुदतवाढ मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा असतानाच शासनाने प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आल्याने प्रशासक राज येणार आहे असे असले तरी प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती होते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्वच क्षेत्रातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने अनेक इच्छुक उमेदवांराच्या सर्व मनसुब्यावर पाणी फिरले आहे. प्रारंभी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे धोरण शासनाचे होते परंतु हाही निर्णय बदलन्यात आल्याने आता गावातूनच एका व्यक्तीस प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याने गावागावातही अनेकांना संभाव्य प्रशासक म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले होते. मात्र आता गावात सरपंच पदाच्या आरक्षण धोरणानुसार त्याच प्रवर्गातील व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या सूचना असल्याने गावागावात मोठा पेच निर्माण झाला आहे.

इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासकीय नियुक्तीच्या हालचाली वाढल्या आहेत. पालकमंत्री यांच्या शिफारशीने या नियुक्त्या होणार असल्याने गावातून आपली अथवा आपल्याच समर्थकांची वर्णी लागावी यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. तालुक्यात भरविर बु, तळोघ, कुर्नोली, बलायदुरी, गुरुडेश्वर, शेणवड खुर्द, फांगुळगव्हाण, टीटोली या ग्रामपंचायतीत प्रशासक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून काम करण्याची संधी कोणाला मिळणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com