
नाशिक | NASHIK
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Nashik Agricultural Produce Market Committee) प्रशासक आल्यापासून बाजार समितीच्या कामकाजात सुधारणा झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यात बाजार समिती शुल्कासह गाळ्यांचे उत्पन्न, वाहन प्रवेश शुल्क यांच्यात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती सहकारी संस्थेचे तालुका उपनिबंधक तथा प्रशासक फय्याज मुलाणी (Fayaz Mulani) यांनी दिली.
बाजार समितीच्या मागील वर्षीच्या बाजारशुल्काची वसुली १२ हजारावरून १५ ते २० हजार रुपये प्रतिदिन अशी झाली आहे. दीड महिन्याच्या उत्पन्नात ९१ लाख ४१ हजार रुपये इतकी वाढ झाली आहे. पेठरोड येथील पक्के गाळे, तसेच पंचवटी मार्केटयार्ड येथील पक्के व पत्र्यांचे गाळे यांचे थकीत भाडे वसूल करण्याचे आदेश सेवकांना दिले आहेत.
बाजार समितीच्या खर्चात कपात करण्यात आलेली आहे. प्रशासक हे बाजार समितीच्या वाहनांचा वापर करीत नाहीत. अनावश्यक खर्चावर आळा घातला असून,एप्रिल महिन्याच्या आणि यंदाच्या एप्रिल महिन्याच्या उत्पन्नाची तुलना केली असता, त्यात ५३ लाख १२ हजार ६७५ रुपयांनी वाढ झाली आहे.
मुख्य मार्केट यार्डात गाळ्यांच्या उत्पन्नात २८ लाख ३५ हजार ९८६ रुपयांनी वाढ झाली. पेठरोड मार्केटयार्डात ३२ लाख २२ हजार ५०६ रुपयांनी वाढ झाली. फ्रूट मार्केटमध्ये प्रतिदिन केवळ १७ हजार रुपयांची वसुली होत होती, ती आता तब्बल ७८ हजार रुपये होत आहे. मुख्य मार्केटयार्डाच्या प्रवेशद्वारावर होणारी स्वच्छता, सुरक्षा या व्यतिरिक्त अन्य कोणताही खर्च केला जात नसल्याचे मुलाणी यांनी सांगितले.
तसेच प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कृषी पणन मंडळाची ( Agricultural Marketing Board) बाजार समितीकडील थकीत असलेली अंशदानाची सुमारे ६३ लाख ९९ हजार ९२३ रुपये व चालू अंशदान ८१ लाख २३३ रुपये, अशी एकूण १ कोटी ४५ लाख १५६ रुपये पणन मंडळास अदा केली आहे. तसेच शासनाची फी १८ लाख ७ हजार ३ रुपये व टीडीएस रक्कम १८ लाख रुपये अदा केली असल्याचे मुलाणी यांनी सांगितले.