येवला । Yeola

विदयमान संचालक मंडळाची मुदत संपल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक झाली असून येथील सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी आज या पदाचा पदभार घेतला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मुदत संपलेल्या सर्वच संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहे. येथील बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १९ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. करोनामुळे या काळात कुठल्याही निवडणुकांना झाल्या नसून विद्यमान संचालक मंडळ कामकाज पाहत होते. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका २४ सप्टेंबरच्या निर्णयाद्वारे सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहेत.

मात्र सदरच्या आदेशात विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा कुठलाही उल्लेख नसल्याने जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी येथील सहायक निबंधक एकनाथ पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबत आज सर्व संचालकाला आदेश पारित करून पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. प्रशासक नेमल्यानंतर पुढील सहा महिन्याच्या आत निवडणूक व्हावी असा नियम असल्याने येथील निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होऊ शकतो अशी शक्यता आहे.

संचालक मंडळाची मुदत संपूनही मागील चार महिन्याच्या काळात संचालक मंडळ बाजार समितीचा कारभार व्यवस्थितपणे चालवत आहे. पुढील तीन-चार महिन्यात पुन्हा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शासनाने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देऊन पुढील कालावधीत काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांना भेटून करणार आहेत.