'या' बाजार समितीवर अखेर प्रशासकराज

'या' बाजार समितीवर अखेर प्रशासकराज

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ (Board of Directors of Agricultural Produce Market Committee) अखेर बरखास्त होवून प्रशासक राजवटीस प्रारंभ झाला आहे.

समितीच्या प्रशासकपदी उपनिबंधक जितेंद्र शेळके यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला पदभार स्विकारला आहे. करोना (corona) व सोसायटी निवडणुकांमुळे (election) दोन वेळा संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली होती.

यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला होता. मात्र प्रशासकाची नियुक्ती झाल्याने जुलै-ऑगस्ट महिन्यात बाजार समितीची निवडणूक (Election of Market Committee) होण्याचे संकेत मिळत असल्याने राजकीय पटलावर हालचाली गतीमान होण्यास प्रारंभ झाला आहे. येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येवून 22 एप्रिलरोजी प्रशासकाची नियुक्ती (Appointment of Administrator) करण्यात आली आहे. सटाणा (satana) येथील उपनिबंधक जितेंद्र शेळके यांची प्रशासकपदी नियुक्ती जिल्हा उपनिबंधकांतर्फे करण्यात आली आहे. प्रशासकाची नियुक्ती होताच समितीची निवडणूक (election) लढवू इच्छीणार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

10 मार्च 2021 रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली होती. मात्र करोना उद्रेकामुळे निवडणूक प्रक्रिया राबविणे अशक्य असल्याने सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी संचालक मंडळातर्फे पणन संचालकांकडे करण्यात आल्याने ही मागणी मान्य करण्यात आली होती. सहा महिन्याची मुदतवाढीची मुदत संपल्यानंतर निवडणूक लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दाखल झालेल्या याचिकेवरून सोसायटीच्या निवडणुका पुर्ण झाल्याशिवाय बाजार समितीच्या निवडणुका घेण्यास मनाई केली होती.

येथील बाजार समितीवर कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाचे प्रभुत्व आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने (Aurangabad High Court) सोसायटी निवडणुका झाल्याशिवाय समितीच्या निवडणुकीस मनाई केली होती. त्यामुळे बाजार समितीवर कृषिमंत्र्यांच्या प्रभुत्वामुळे प्रशासकाची नियुक्ती न होता विद्यमान पदाधिकार्‍यांनाच कारभार पाहण्याची संधी पुन्हा मिळाली मात्र निवडणूक पुन्हा लांबल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली होती.

तालुक्यात सोसायटी निवडणुकींची रणधुमाळी अंतीम टप्प्यात सुरू असतांनाच बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. 9 मेपर्यंत सोसायटी निवडणुकांची रणधुमाळी सुरू राहणार असून नंतर जुनपर्यंत पदाधिकारी निवड प्रक्रिया देखील पुर्ण होवून बाजार समिती निवडणुकीचे पडघम वाजणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.