
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही तिच्या आगामी 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात क्रिती सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा सिनेमातील लूक आऊट करण्यात आला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अशातच आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री कृती सेनने नाशिकमध्ये (Nashik) हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
अभिनेत्री क्रिती सेनन काळाराम मंदिरात (Kalaram Temple) जाऊन दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत 'राम सिया राम' या गीताचे गायक सचेत टंडन आणि परंपरा टंडन हे देखील होते. सीता गुंफा आणि काळाराम मंदिरातील क्रिती सेननचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ती 'राम सिया राम' म्हणत आरती करतांना राम भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे.
तसेच या व्हिडीओमुळे प्रेक्षक क्रिती सेननचे कौतुक करत असून तिच्या फोटो आणि व्हिडीओवर 'जय सिया राम','जय श्रीराम' अशा कमेंट्स करत आहेत. तर दुसरीकडे सिनेमासाठी कोणत्याही थराला जाणार का?, सिनेमा रिलीज होताना देव आठवतो का?", अशा कमेंट्स देखील नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या सिनेमात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, 'आदिपुरुष' हा चित्रपट येत्या १६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठमोळ्या ओम राऊतने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटातील 'राम सिया राम' हे गाणे नुकतचे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.