नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) यांच्याकडून बुधवारी (दि.20) करण्यात आलेल्या सरप्राईज व्हिजीटमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील तब्बल 143 लेटलतीफ आढळून आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये उशिराने येणार्या सेवकांची झाडाझडती घेत यापुढे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याची तंबी देतानाच नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागप्रमुखांना दिले.

शासनाने राज्यात पाच दिवसांचा आठवडा केला असून कार्यालयीन वेळेतदेखील बदल केला असून शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यत करण्यात आली आहे. करोनाच्या कालावधीत शासकीय सेवकांना उपस्थितीबाबत शासनाने वेळोवेळी सुविधा दिल्या होत्या. मात्र 100 टक्के उपस्थितीने कार्यालये सुरु झाल्यानंतरही अनेक सेवक कार्यालयीन वेळेत येत नसल्याचे निदर्शनास आल्याने सकाळी 9.45 वाजता सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी सर्व विभागांना भेटी देऊन हजेरी पत्रक व हालचाल पत्रकाची तपासणी केली.

यावेळी सर्व विभागातील 143 सेवक कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील 43 पैकी 6, इवदमधील 120 पैकी 31, शिक्षण विभागातील 97 पैकी 17, ग्रामपंचायत विभागातील 20 पैकी 6, आरोग्य विभागातील 75 पैकी 24, पशुसंवर्धन विभागातील 13 पैकी 6, समाजकल्याण विभागातील 24 पैकी 11, लघु पाटबंधारे विभागातील 25 पैकी 5, पाणी व स्वच्छता विभागातील 15 पैकी 8, महिला व बालकल्याण विभागातील 6 पैकी 3, वित्त विभागातील 46 पैकी 21, कृषी विभागातील 13 पैकी 5 यांचा समावेश आहे.

दरम्यान, सायंकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व सेवकांना आपल्या दालनात बोलावून चांगलीच झाडाझडती घेतली. तसेच यापुढे वेळेवर उपस्थित न राहिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागप्रमुखांना दिले.