शेतकर्‍यांना फसविल्यास गय नाही

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांचा स्पष्ट इशारा
शेतकर्‍यांना फसविल्यास गय नाही

सटाणा । प्रतिनिधी

दिवसरात्र कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांच्या घामाच्या पैशावर गंडा घालण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई पोलीस यंत्रणेतर्फे केली जाईल.

असा स्पष्ट इशारा देत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांचे पैसे मिळवून देण्यास कटीबध्द असल्याची ग्वाही बोलतांना दिली.

येथील राधाई मंगल कार्यालयात व्यापार्‍यांकडून फसवणूक झालेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांचा मेळावा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्रबापू पाटील, माजी आ. संजय चव्हाण, मविप्र उपसभापती राघो अहिरे, शंकरराव सावंत, विलास बच्छाव, खेमराज कोर, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, पो.नि. नंदकुमार गायकवाड आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

शेतकरी घाम गाळून पिकांचे उत्पादन घेतो. त्यामुळे त्यांचा कष्टाचा पैसा बुडविण्याचा प्रयत्न कुणी व्यापारी करत असेल तर गाठ आपल्याशी आहे हे ध्यानात ठेवा. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांविरूध्द कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचे डॉ. दिघावकर यांनी पुढे बोलतांना सांगितले. यावेळी त्यांनी सटाणा महाविद्यालयात असलेले स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचा बागलाण पॅटर्न म्हणून नावलौकिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

मेळाव्यास नानाजी दळवी, यशवंत पाटील, यशवंत अहिरे, खंडेराव शेवाळे, कृष्णा भामरे, पोपट अहिरे, विजय वाघ, सुधाकर पाटील, लालचंद सोनवणे, फईम शेख, प्रकाश निकम आदींसह शेतकरी उपस्थित होते.

600 भुमीगत बंधार्‍यांसाठी पाठपुरावा

बागलाण तालुक्यात एकुण 65 शेतकर्‍यांची व्यापार्‍यांनी फसवणूक केल्याच्या अधिकृत तक्रारी दाखल झाल्या असून येत्या 15 दिवसात कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून शेतकर्‍यांचे बुडीत पैसे मिळवून देण्यात येतील. जन्मभूमी असलेल्या बागलाण तालुका सुजलाम्-सुफलाम् व्हावा यासाठी प्रलंबित सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून 25 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून एकुण 600 भुमीगत बंधारे बांधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. दिघावकर यांनी सांगताच उपस्थित शेतकर्‍यांनी टाळ्यांचा कडकडाट करत आनंद व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com