नाशिक । प्रतिनिधी

शहरात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन हा प्रादुर्भाव रोकण्यासाठी आता सहा विभागातील मार्केट, शॉपींग, भाजीपाला मार्केट, बस स्थानक सार्वजनिक ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापणार्यांविरुध्द दंडाची जोरदार मोहीम महापालिका प्रशासनाकडुन सुरू करण्यात आली होती.

आता दुसर्या करोना लाटेची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडुन पुन्हा एकदा धडक कारवाईची तयारी केली आहे. महापालिका प्रशासनाने जुन पासुन ते 19 नोव्हेंबर या कालावधीत 3 हजारावर नागरिकांवर केसेस करीत संबंधीतांकडुन 6 लाखाच्यावर रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

गेल्या जुन महिन्यात राज्य शासनाने लॉकडाऊनमधील अनेक आस्थापने सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर नागरिकांची अनेक ठिकाणी गर्दी दिसुन आली, परिणामी करोनाचा मोठा संसर्ग नाशिक महापालिका क्षेत्रात दिसुन आले होते. यामुळे मास्क न वापरणारे व रस्त्यावर व सार्वजनिक जागेवर थुंकणार्यावर दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला होता.

महापौर सतिश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांनी मास्क न वापरणारे व रस्त्यावर थुंकणारे यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शहरात मोंठ्या प्रमाणात दंडाची कारवाई करण्यात आली. मध्यंतरी व दिवाळीच्या काळात ही कारवाई थंडावली गेली होता. आता थंडीच्या दिवसात करोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता असल्याने आता पुन्हा एकदा आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत विभागीय अधिकार्यांना मास्कसंदर्भातील कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

प्रत्येक विभागातील डीएसआय व एसआय यांच्या पथकाने गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणार्याविरुध्द व सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणार्याविरुध्द धडक दंडात्मक कारवाई आता सुरू झाली आहे. गेल्या जुन ते आक्टोंबर अशा पाच महिन्याच्या काळात 2 हजार 915 व्यक्तीवर दंडाची कारवाई करीत त्यांच्याकडुन 5 लाख 83 हजार रुपये वसुल करण्यात आला होता.

आता दंड वसुलीचा आकडा 6 लाखांवर गेला असुन तीन हजारावर नागरिकांवर केसेस करण्यात आल्या आहे. 12 ते 19 नोव्हेंबर या आठवडाभरात मास्कबाबत 19 केसेस करण्यात येऊन 3 हजार 800 रुपये दंड वसुल करण्यात आला असुन या कारवाईला वेग देण्यात आला आहे.