वैद्यकीय अधिकार्‍यावर कारवाई

रुग्णाचा थेट जि. प. सीईओंना फोन
वैद्यकीय अधिकार्‍यावर कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग ( Health Department of Nashik Zilla Parishad ) अंतर्गत येणार्‍या नैताळे (ता. निफाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Naitale Primary Health Center )वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याची तक्रार एका रुग्णाने थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ( Leena Bansod- ZP CEO)यांच्याकडे केली आहे.

या तक्रारींची गंभीर दखल घेत, शहानिशा करत संबंधित अधिकारी कोणताही अर्ज न देता गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यावर, बनसोड यांनी तत्काळ संबंधित कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यावर सेवामुक्तची कारवाई केली आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या विनापरवानगी गैरहजर राहणारांना दणका बसणार आहे.

नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि.16) दुपारच्या वेळी एक रुग्ण तपासणीसाठी आला. त्यावेळी आरोग्य केंद्रात सेविका व्यतिरिक्त उपचार करण्यासाठी कोणीही अधिकारी हजर नव्हते. हे पाहून संबंधित रुग्णाने थेट मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांच्याकडे मोबाईलद्वारे तक्रार करत, आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या तक्रारीची तत्काळ दखल घेत बनसोड यांनी शहानिशा करत माहिती घेतली.

यात आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे समोर आले. संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी कोणताही अर्ज न देता किंवा कोणालाही न सांगत रजेवर असल्याचे लक्षात आले. दरम्यान, संबंधित रुग्णास तत्काळ उपचारासाठी एका तासात अधिकारी पाठवत, त्याच्यावर उपचार केले. यानंतर, गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यास सोमवारी (दि.18) बोलावून घेत विचारणा केली.

वैद्यकीय अधिकारी यांची बाजू ऐकून घेतली. मात्र, वैद्यकीय अधिकारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर बनसोड यांनी तत्काळ संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यास सेवामुक्त करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. आरोग्य विभागानेही तत्काळ कारवाई करत संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यावर सेवामुक्त करण्याची कारवाई केली आहे.

कारवाईचे स्वागत

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याच्या वारंवार तक्रारी होत आहेत याची दखल घेत प्रशासन कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र,कारवाई झाली की, लोकप्रतिनिधी मध्यस्थी करत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. मात्र, आता प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासक बनसोड यांनी थेट कारवाई केली आहे. या कारवाईचे स्वागत ग्रामीण भागातील जनतेकडून होत आहे.

Related Stories

No stories found.