पंचवटीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच आस्थापनांवर कारवाई

२५ हजारांचा दंड वसूल
पंचवटीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच आस्थापनांवर कारवाई

पंचवटी | Panchavti

राज्यात कोरोनाची दुसरी लाट असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. लॉक डाऊन सदृश परिस्थितीत पुन्हा एकदा पंधरा दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

या कालावधीत शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना, नागरिक यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरू आहे. सोमवारी (दि.३) करोना नियमांचे उल्लंघन करीत पाच अस्थापनांवर कारवाई करीत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात 'ब्रेक द चेन' राज्य शासनाने लॉक डाऊन सदृश कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग तोडण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असून, संचारबंदी लागू केली आहे.

यासह विनाकारण व विना मास्क फिरणारे, वेळेपेक्षा जास्त वेळ आस्थापना सुरू ठेवणे, विनाकारण आस्थापना सुरू ठेवणे, सोशल डिस्टनसिंग न राखणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात प्रशासन दंडात्मक कारवाई करीत दंड वसूल करीत आहेत.

सोमवारी (दि.३) दुपारी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्यासह पोलीस कर्मचारी गस्त घालीत असताना काही आस्थापना कोरोना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी पंचवटीतील जय भवानी सिड्स, ललवाणी कृषी एजन्सी, अभिषेक शेती उद्योग भांडार, ओमकार ऍग्रो टेक, महावीर ट्रेडर्स या पाच आस्थापनांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करीत, २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई पंचवटी पोलीस व मनपा कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com