सेवा नाकारणार्‍या आरोग्य सेवकांवर फौजदारी कारवाई
नाशिक

सेवा नाकारणार्‍या आरोग्य सेवकांवर फौजदारी कारवाई

मेस्माअंतर्गत 200 आरोग्य सेवकांना नोटिसा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी मागील महिन्यात झालेल्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर पॅरामेडीकल स्टाफ पदाच्या भरतीच्या मुलाखती कामावर हजर होण्याचा होकार देणार्‍या आणि नंतर नियुक्ती आदेश दिल्यानंतर कामावर हजर न होणार्‍या आरोग्य सेवकांना आता फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. महापालिका प्रशासनाकडून आता 70 आरोग्य सेवकांवर गुन्हे दाखल करण्याच्या व 200 जणांवर मेस्मांतर्गत नोटिसा बजावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे.

करोना(कोविड-19) च्या कामकाजासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने 811 इतक्या विविध पदावर मानधनावर भरतीची प्रक्रिया मागील महिन्यात पूर्ण करण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या सुमारे 500 उमेदवारांनी थेट मुलाखतीत सहभाग नोंदवित मुलाखतीत कामावर हजर होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या सहमतीनंतर या सर्वांना प्रशासनाकडूून नियुक्ती आदेश देण्यात आलेले असून यात काही जणांना थेट पत्र, व्हॉटस् अ‍ॅपद्वारे नियुक्त पत्र देण्याबरोबर एसएमएस पाठविण्याचे काम झाले आहे.

यातील काही आरोग्य सेवक हजर झाल्यानंतर सेवा सोडून गेले आहे. या प्रकारामुळे करोना बाधीत रुग्णांवर केल्या जाणार्‍या उपचारावर परिणाम झाले आहे. नियुक्ती दिलेले जे सेवक अद्याप हजर झाले नाही त्याच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

कोरोना (कोविड-19) च्या कामकाजासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने फिजिशियन (10 जागा), भूलतज्ज्ञ (10जागा), रेडिओलॉजिस्ट(5), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस 50), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस 100), मानसोपचार तज्ज्ञ(2), आहारतज्ज्ञ(2), समुपदेशक(30), मल्टी हेल्थ वर्कर (100), मायक्रो बायोलॉजीस्ट (2), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (25), मिश्रक (65), रेडिओग्राफर (10), स्टार्फ नर्स (250), एएमएम (150) या विविध पदांसाठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून थेट मुलाखतीद्वारे मानधनावर घेण्याच्या दृष्टीने भरतीप्रक्रिया राबवली होती.

या थेट मुलाखतीद्वारे ज्यांची निवड झाली त्या सर्वांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.त्यातील जे पात्र असे उमेदवार रुजू झाले नाहीत त्यातील 70 जणांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र ते अद्यापही हजर न झाल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्त गमे यांनी दिले आहेत. तसेच याच निवड प्रक्रियेतील 200 उमेदवार हजर झालेले नसून या सर्वांना मेस्मा अंतर्गत नोटिसा देण्यात येणार असून हे उमेदवार हजर न झाल्यास मनपाच्या वतीने कठोर पावले उचलून गुन्हे नोंदविणेची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com