
दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) पिंपळणारे येथील अत्याचार प्रकरणातील अटक झालेला आरोपी पोलिस कोठडीत (Police Custody) तपास चालू असतांना पोलिसांच्या हातातून निसटून फरार झाला होता. त्यातील पिडीत युवतीने आत्महत्या (Suicide) केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी यातील तपासी अधिकारी व सह पोलिसास निलंबित केले. त्यातच आता अत्याचारातील फरारी आरोपीचा मृतदेह (Dead Body) विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्य उमेश बंडू खांदवे (३५) या विवाहित युवकावर गावातीलच एका वीस वर्षीय युवतीने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार (Rape) केल्याची फिर्याद नोंदविली होती. यात आरोपी उमेश खांदवे याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर आरोपी उमेश खांदवे याला दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपीस (दि. ३० सप्टेंबर) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
यावेळी पोलिस तपासासाठी दिंडोरी पोलिसांनी आरोपीला स्थळ पंचनाम्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे घेऊन गेले होते. तेथून परततांना आरोपी लघुशंकेचा बहाणा करुन पोलिसांच्या हाताला झटका देवून फरार झाला होता. तसेच (दि. २८ रोजी) रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या शेतातील विहीरीच्याकडेला कपडे व चपला आढळून आल्या होत्या. त्यासोबतच एका चिठ्ठीमध्ये गावातील काही व्यक्तींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यावेळी विहीरीत (well) आपत्ती व्यवस्थापनाच्या (Disaster Management) मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु, विहीरीमध्ये पाणी जास्त असल्याने त्यास यश आले नाही.
त्यानंतर पिडित युवती प्रिया खांदवे हिने त्यांच्या स्वत:च्या विहीरीत दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. युवतीच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी विहिरीचे पाणी तीन मोटारीच्या सहाय्याने उपसण्यात आले. मंगळवार (दि.०३ ऑक्टोबर) रोजी पहाटेच्या सुमारास उमेशचा भाऊ विहिरीजवळ जाऊन बॅटरीच्या सहाय्याने विहिरीमध्ये बघितले असता त्यात उमेशचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी त्यांनी तात्काळ दिंडोरी पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, यानंतर घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व दिंडोरी पोलिस तेथे दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी मृतदेहाच्या पायाला मोठा दगड बांधल्याचे आढळून आले. यावेळी दिंडोरी येथील न्यायाधीश यांच्यासमोर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील फॉरेन्सिक विभागामध्ये पाठवण्यात आला आहे. दिंडोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास कळवणचे पोलिस उपविभागीय अधिकारी एस.आर.बाबंळे हे करीत आहेत.
तपासी अधिकारी निलंबित
या गुन्ह्यात आरोपीला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पोलिस तपास करतांना आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. त्यानंतर पिडीत युवतीने आत्महत्या केली. त्याचबरोबर फरार आरोपीचा मृतदेह विहीरीमध्ये आढळला. यात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या तपासातील अधिकारी दिंडोरीचे पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे व पोलिस नाईक सुदाम धुमाळ या दोघांना निलंबित केले आहे. त्यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिस तपासात कोणतीही शंकेची बाब येवू नये, म्हणून या गुन्ह्याचा तपास कळवण विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी बांबळे यांच्याकडे देण्यात आले आहे. तपासामध्ये कोणता निष्कर्ष निघणार? आणि यामध्ये आणखी कुणाला अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर अत्याचारातील फरार आरोपी उमेश खांदवे याने मृत्यूपुर्वी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या काही व्यक्तींची नावे लिहून ठेवले आहे. याबाबत सखोल चौकशी करुन सत्यता पडताळण्यात येईल. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाहीसाठी गुन्हा नोंद करण्यात येईल.
एस.आर. बाबंळे,अधिकारी पोलिस उपविभागीय, कळवण