
वणी | Vani
चालकाचा बसवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला मोटरसायकलसह उभ्या असलेल्या दांपत्यास जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा चार महिन्यांच्या बालिकेसह जागीच मृत्यू झाला. बस रस्त्यांच्या कडेला झाडावर जाऊन आदळल्याने बसमधील पाच प्रवासी जखमी झाले...
त्यातील एकाची प्रकृती चिंताजक असल्याने त्याला नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. एकाच कुटूंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिंडोरी तालुक्यातील काल दुपारी 1.30 च्या सुमारास वणी ते सापुतारा रोडवर प्रिंप्री अंचला फाट्याचे पुढे सुरगाणा ते नाशिक जाणारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोटार सायकलला उडविल्यामुळे अपघात झाला आहे. या अपघातात निफाड तालुक्यातील सारोळा येथील विशाल नंदू शेवरे (24), पत्नी - सायली विशाल शेवरे (20) व चार महिन्यांची चिमुकली अमृता विशाल शेवरे असे एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदरील कळवण डेपोच्या सुरगाणा येथून नाशिककडे जाणार्या बसला पिंप्रीअंचला फाटा येथे अपघात झाला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी जखमी प्रवाशी मंजुळा एकनाथ वाघमारे (28) रा. हनुमंतपाडा, देविदास तुळशीराम भोये (30) रा. वर्ष उमरेमाळ, तारा रमेश कुवर, रमेश नाथा कुवर रा.गंगोत्री अपार्टमेंट निमाणी नाशिक यांच्या छातीला गांभीर दुखापत असून कृष्णा त्र्यंबक गांगोडे (26) वर्ष गाव उंडओहळ ता. सुरगाणा यांचे चारही बोट वाकडे झाली असून एक अंगुठा तुटला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बस चालक अशोक सखाराम गांगोडे असे त्यांचे नाव असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरसट यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.