शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य

मुख्याध्यापक संघाची शिक्षण उपसंचालकांसमवेत सहविचार सभा
शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य
शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य

नाशिक । NASHIK प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटना यांचे निवडक पदाधिकाऱ्यांची नाशिक जिल्हा माध्यमिक विभाग प्रभारी शिक्षणाधिकारी तथा शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग नाशिक प्रवीण पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध मागण्या मान्य करण्यात आल्या. शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिकरोड येथे ही सहविचार सभा झाली.

यावेळी नाशिक जिल्ह्याचे लेखाधिकारी खडसे, वेतन पथक अधिक्षक उदय देवरे उपस्थित होते. यावेळी वीस टक्के अनुदानावरील तुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेतरांची प्रलंबित वेतन देयके, पुरवणी देयके, वैद्यकीय देयके, जीपीएफ देयके, डीसीपीएस व पी. एफ. स्लिपा या संदर्भात प्रश्नांना वेतन पथक अधिक्षक उदय देवरे यांनी उत्तरे दिली.

यामध्ये वीस टक्के अनुदानावरील तुकड्यांचे वेतन देयक आजच आयडीबीआय बँकेत जमा केले असल्याचे त्यांनी सांगितले. पुरवणी देयके मागील वर्षापासून प्रलंबित असून फेब्रुवारी मध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनी पुरवणी देयकावर स्वाक्षरी न केल्याने ते मुदतीत वरिष्ठ कार्यालयात प्रलंबित राहिलेले असल्याचे सांगितले. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचेही यावेळी आश्वासन त्यांनी दिले.

या महिन्याच्या पंधरा तारखेपासून कार्यलयात टपाल विविध प्रस्ताव स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्धवेळ ग्रंथपाल सातव्या वेतन आयोगाचा पहिला टप्पाही मागणी पुरवणी देयकात असल्यामुळे पुरवणी देयकासमवेत मंजूर होतील.

तसेच अर्धवेळ सेवकांची सातव्या वेतन आयोगाची रोखीच्या फरकाबाबत लवकरच कार्यवाही करतो असे सांगितले. डीसीपीएसच्या बहुतांश स्लिपा ह्या शाळेकडे सुपूर्द करण्यात आल्या असून जीपीएफ स्लिपांचे मागील वर्षापर्यंत कार्यवाही झालेली त्यानुसार शाळांना स्लिपा देण्यात येत आहेत.

लेखाधिकारी संजय खडसे यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पाठवावे,असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे संस्थेने वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांची सेवाजेष्ठ्ता यादी शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक संघाने फक्त निवड श्रेणीबाबत प्रस्ताव शिक्षण विभागाकडून पाठवावा मात्र वरिष्ठ श्रेणीचा प्रस्ताव लेखाधिकारी यांचे कार्यालयाने स्वीकारून त्यास मान्यता द्यावी,अशी मागणी केली.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे समन्वयक के. के. अहिरे, अध्यक्ष गुलाब भामरे, सेक्रेटरी आर. डी. निकम, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, टीडीएचे निलेश ठाकूर, सुनिल वाबळे, गोरख कुणगर, यशवंत ठोके, संजय देवरे, ग्रंथालय शिक्षक परिषदेचे विलास सोनार, प्रयोगशाळा संघटनेचे संग्राम करंजकर, शिक्षण विभागाचे निरीक्षक अशोक बागुल, निरभवणे, आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com