परिस्थितीचा स्वीकार करा!

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ऋचा सुळे यांचा सल्ला
परिस्थितीचा स्वीकार करा!
USER

नाशिक । प्रतिनिधी

आपल्यालाही करोनाचा संसर्ग होऊ शकतो या वस्तुस्थितीचा स्वीकार प्रत्येकाने करावा. दुर्दैवाने तशी वेळ आलीच तर त्यासाठी मनाची आणि अन्य अनेक गोष्टींची तयारी करून ठेवा. कठीण प्रसंगी मनाचा समतोल राखण्यासाठी अशी तयारी ठेवणे खूप गरजेचे आहे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ऋचा सुळे यांनी दिला आहे. करोना काळात मनाची ताकद कशी वाढवायची याचे महत्वाचे उपाय त्यांनी सुचवले आहेत.

मनाची तयारी कशी करायची?

मला संसर्ग होऊच शकत नाही असेच काही माणसे धरून चालतात. लक्षणे दिसत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्याला हा आजार होऊ शकतो याचा माणसे स्वीकारच करत नाहीत. पण अशा वेळी थोडे सतर्क राहून जर वस्तुस्थितीचा स्वीकार केला तर पुढच्या गोष्टी करणे खूप सोपे जाते. जेवढ्या लवकर आपण स्वीकार करू तेवढ्या लवकर सामना करण्याची हिंमत येते. आपण आपोआपच पर्याय शोधायला लागतो. आपल्याला काय करता येणार नाही आणि काय करता येणार आहे याचा सकारात्मक विचार करायला लागतो. काही दिवस बाहेर जाता येणार नाही. मग त्यावेळेच्या सदुपयोग कसा करायचा हेही सुचायला लागते. पण त्याकडे नकारात्मक पाहिले तर भावनाही तशाच निर्माण होतात. माझे कसे होईल? मला एकटेच राहावे लागेल. मी बरा होईल का? असे नकारात्मक विचार मनाचा ताबा घेतात. तसे करू नका. कारण उपाय लागू पडण्यासाठी सकारात्मक भावना खूप गरजेची असते.

भावनिकदृष्ट्या स्थिर कसे राहायचे?

सध्याच्या परिस्थितीत कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत आहेत. अशा वेळी कोणी कोणाला आधार द्यायचा असा प्रश्न उभा राहातो. करोनाच्या निर्बंधांमुळे बाहेरचे कोणी घरी येऊ शकत नाही आणि घरातले बाहेर जाऊ शकत नाही. अशा वेळी रुग्णाची काळजी घेण्याची जबाबदारी एका सदस्यावर येऊ शकते. त्या व्यक्तीने भावनिक दृष्टीने स्थिर राहाणे खूप गरजेचे आहे. कारण या काळात भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. किंवा काही व्यक्ती परिस्थितीपासून पळून जायचा देखील प्रयत्न देखील करतात. तसे करू नका. परिस्थितीचा स्वीकार करा. पॅनिक होऊ नका. वस्तुस्थितीचा सकारात्मक विचार करून उपायांची अंमलबजावणी करा.

मनावरचा ताण कसा कमी करावा?

इतरांवर अवलंबून राहाणे कोणालाच आवडत नाही. त्यामुळे आपल्या माणसांना आपले किती करावे लागते या जाणिवेने रुग्णांच्या मनात अपराधाची भावना निर्माण होऊ शकते. अशा नकारात्मक भावनांचा प्रकृतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ताणामुळे सॅच्युरेशन कमी होऊ शकते. मला सारखा तापच का येतो? पुढे काय होईल? डॉक्टर का आले नाहीत?ऑक्सिजन अजून कमी होईल का? डॉक्टर कोणती औषधे देत आहेत? अशा शंका मनात घेत राहिलात तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी शांत राहा. जे चालले आहे त्या फ्लो बरोबर राहा. स्वतःला एकदा डॉक्टरांच्या स्वाधीन केले आहे ना मग ते योग्य निर्णय घेतील आणि मी निश्चितपणे यातून बाहेर पडेल यावर विश्वास ठेवा.

रुग्णाचा एकटेपणा कसा घालवावा?

या काळात पारिवारिक सुसंवाद खूप गरजेचा आहे. एकमेकात चर्चा करावी. गप्पा माराव्यात. अन्यथा होते काय, रुग्ण त्याच्या खोलीत एकटा असतो. त्याला काही दिवस एकटेच राहावे लागणार असते. त्यामुळे हळूहळू तो एकटेपणा वाढत जातो. त्याचाही ताण वाढत जातो. अशावेळी पारिवारिक सुसंवाद आवश्यक असतो. रुग्णाचे आणि त्याची काळजी घेणार्‍या व्यक्तीचे मन मोकळे होणे खूप गरजेचे असते. त्यासाठी पारिवारिक सुसंवाद खूप मदत करतो.

पॅनिक होणे कसे टाळावे?

मला संसर्ग होईल का अशी भीती माणसांना वाटत आहे. ती चुकीची नाही. रास्त आहे. फक्त ती प्रमाणाबाहेर असू नये. ही भीती कमी करण्यासाठी समजा मला संसर्ग झालाच तर मी त्याचा सामना करण्यासाठी आपल्या परीने तयारीत राहिलो म्हणजे आर्थिक तयारी, तर त्याचा जास्त फायदा होईल. ती तयारी आपल्याला करता येण्यासारखी आहे. या आजारापासून लांब राहाण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करत नाही ना हे पाहा. उदाहरणार्थ विनाकारण फिरत नाही ना? मास्क लावल्याशिवाय बाहेर फिरतो का? गर्दीत जातो आहोत का? या परिस्थितीत अशी बेफिकिरी टाळली पाहिजे. पॅनिक होऊ नका. घाबरू नका. निर्बंध पाळा.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com