‘निओ मेट्रो’ प्रकल्पाला गती; जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पासाठी सिटीलिंक बससेवेचा डेपो असलेल्या चेहेडी तसेच गंगापूर येथे महामेट्रोने मागणी नोंदवली आहे. त्यानुसार प्रकल्पाला गती देण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंंडवार यांनी तातडीने भूसंपादन व मिळकत विभागाला जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या प्रकल्पासाठी 2165 कोटी रुपये खर्च येणार आहे. 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र अद्यापही केंद्रिय मंत्रिमंडळाची प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. काही महिन्यांपूर्वी पीएमओने याबाबत मनपाला सादरीकरण करण्यासाठी अधिकार्यांना दिल्ली येथे बोलावले होते. राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या नगरविकास व गृहमंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यात 10.41 किलोमीटरचा पहिला टप्पा प्रायव्हेट तत्त्वावर पूर्ण करण्याची परवानगी मागण्यात आली.
प्रायोगिक तत्त्वावरील पहिल्या टप्प्याचा खर्च राज्य शासन करणार आहे. त्या अनुषंगाने महापालिका मुख्यालयात महामेट्रोचे अधिकारी व महापालिका अधिकार्यांमध्ये बैठक झाली. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे विकास नागुलकर, नगररचना विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर, मिळकत विभागप्रमुख उपायुक्त मनोज घोडे-पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके उपस्थित होते.
निओ मेट्रो प्रकल्प अमलात आणताना महापालिकेचा देखील वाटा आहे. त्याअनुषंगाने मनपाकडून सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवण्यात आली. मनपा मुख्यालयात महामेट्रोसाठी कार्यालयदेखील उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवण्यात आली. द्वारका ते नाशिक रोड तसेच द्वारका ते शालिमार व गंगापूर रोड या भागाचे नकाशे दाखवण्यात आले.