शेती मशागतीला गती; शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीला प्राधान्य

शेती मशागतीला गती; शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीला प्राधान्य

अंबासन । प्रशांत भामरे | Ambasan

नामपूरसह (nampur) परिसरात पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामासाठी (kharip season) शेती मशागतीची कामे करण्यात बळीराजा व्यस्त झाला असून वाढते डिझेल-पेट्रोलचे (Diesel-petrol) भाव व कांद्याचे अत्यल्प बाजारभाव लक्षात घेता बळीराजा पुन्हा आपल्या सर्जा-राजाच्या जोडीने शेती मशागतीस पसंती देत दिसून येत आहे.

शेत नांगरणीच्या कामांना परिसरात मोठा वेग आला आहे. बैलजोडी नसलेले शेतकरी (farmers) मात्र नाईलाजास्तव वाढीव दराचा फटका सहन करत ट्रॅक्टरच्या (Tractor) सहाय्याने शेती मशागतीची कामे (Farming activities) करुन घेत आहेत.

गेल्यावर्षी पावसाळ्याचे अल्प प्रमाण राहिल्याने चालू वर्षी विविध वेधशाळांकडून चांगल्या पावसाचा अंदाज (Rainfall forecast) वर्तविला जात असल्याने आगामी खरीप हंगामाबाबत शेतकरी (farmers) आशवादी आहेत. नामपूर परिसरात बहुतांश कांदा पिकाची (onion crop) काढणी आटोपली असून खरीपासाठी शेत तयार करण्यास शेतकरी सरसावले आहेत. यावर्षी कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याने बळीराजाची मानसिकता खालावली आहे. त्यातच कांद्याला पुरेसा बाजारभाव नाही. बाजारात कांद्याला 600 ते 900 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही.

डिझेलच्या भाववाढीमुळे (rise in diesel prices) ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती मशागत करण्यासाठी भाडे वाढले असून एक एकर नांगरणीसाठी 2500 ते 2800 रुपये मोजावे लागतात. रोटावेटर मारण्यास देखील 2500 ते 2800 रुपये लागतात. डिझेलच्या दिवसागणिक वाढणार्‍या भावामुळे ट्रॅक्टर मालकांना सुद्धा शेतीची कामे परवडत नसल्याने त्यांनी शेती मशागतीचे दर वाढविले आहेत. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात वरुणराजाचे आगमन होण्याचा सर्वच वेधशाळांनी अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे वेळेआधी आपल्या शेतीची मशागत करून शेत तयार ठेवण्यास शेतकर्‍यांनी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

दिवसागणिक शेतीमालाचे बाजारभाव कमी होत असून मागणी मात्र वाढताना दिसत आहे. मजूरटंचाई (Labor shortage) व मजुरीच्या वाढत्या दराबरोबरच पेस्टीसाईडस् (Pesticides) व रासायनिक खतांच्या वाढत्या किंमतींमुळे शेती व्यवसाय अवघड झाला आहे. शेतीत केलेला खर्च व उत्पादनाच्या बाजारातून मिळणार्‍या पैशांचा मेळ बसत नाही. त्यामुळे दिवसागणिक शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे.

वाढत्या महागाईमुळे (Inflation) शेतीसाठी लागणारा खर्च करावाच लागतो. त्याचप्रमाणे मशागतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. मशागतीचे दरही गगनाला भिडले असून वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करत उत्पादीत केलेल्या शेतमालास पुरेसा बाजारभाव देखील मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे ‘आई जेऊ घालिना अन् बाप भीक मागू देईना’ अशीच शेतकर्‍यांची परिस्थिती झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com