अभाविपचा दणका; तीन दिवसांत निकाल लावण्याचे दिले विद्यापीठाने आश्वासन

अभाविपचा दणका; तीन दिवसांत निकाल लावण्याचे दिले विद्यापीठाने आश्वासन

नाशिक | प्रतिनिधी

करोना या जागतिक महामारी मुळे यावर्षी परीक्षा या ऑनलाइन पध्दतीने झाल्या. यात विद्यार्थ्यांना असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान च्या काळात १२ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्या नंतर त्यात देखील विद्यार्थ्याने परीक्षा देऊन देखील गैरहजर दाखवणे, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना शून्य गुण दाखवणे यासारख्या असंख्य तांत्रिक अडचणी आल्या होत्या...

यात अभाविप नाशिकने वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नाशिक महानगराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र, नाशिक येथे ठिय्या आंदोलन केले.

विद्यापीठाच्या अकार्यक्षम कुलगुरूंच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अभाविपने हे आंदोलन केले.

विद्यापीठाने तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर २० ऑक्टोबर दरम्यान देत असताना विविध अडचणींना सामना करावा लागला जसे की वेबसाइटवर लॉग इन करण्यात अडथळा येणे, उशिरा लॉगिन होणे व त्यानंतर पुन्हा लॉग आऊट होणे, पुन्हा लॉगीन केल्यानंतर उत्तरांचे क्रम बदलणे, वेळ संपल्यावर परीक्षा सबमिट झाली असा संदेश येणे परंतु उशिरा लॉगिन झाल्याने वेळ कमी मिळणे अशा समस्या आल्या.

अभाविपच्या या विषयावर आज सलग तीन तास चाललेल्या आंदोलनंतर अखेर विद्यापीठ प्रशासन झुकले. अभाविप च्या शिष्ट मंडळाने पुणे विद्यापीठ, नाशिक उपकेंद्राचे समंवयक डॉ. प्रशांत टोपे, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक महेश काकडे आणि सिनेट सदस्य विजय सोनवणे यांच्याशी चर्चा केली.

यावेळी अभाविपचे प्रदेश सहमंत्री विराज भामरे यांनी परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्या सोबत दूरध्वनी द्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाने येत्या तीन दिवसात विद्यार्थ्यांचे नव्याने निकाल लावण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी शेकडो विद्यार्थ्यांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री विराज भामरे, नाशिक जिल्हा संयोजक अथर्व कुळकर्णी , नाशिक महानगर सहमंत्री सिद्धेश खैरनार , राकेश साळुंके , नगर मंत्री सौरभ धोत्रे , ओम मालुंजकर, धनंजय रासकर, गौरंग बोडके, प्रणाली देसले, तन्मयी बोरसे, सौरभ साबळे यांच्यासह अनेक विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आंदोलनाला उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com