चमत्काराचा दावा करणारा भोंदूबाबा गजाआड

चमत्काराचा दावा करणारा भोंदूबाबा गजाआड
USER

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील दाभाडीजवळील Dabhadi रोकडोबा वस्तीजवळ पाण्यात राख टाकून दारू सोडवणे, मूलबाळ होतील व सर्व आजार व अडचणी दूर करण्याचा दावा करणारा आबा भगत या भोंदूबाबास छावणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आल्याचे पाहताच अनेक भोंदूबाबांनी वस्तीवरून पलायन केले. अंधश्रध्दा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समितीच्या ( Superstition Eradication Committee) सहाय्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

रोकडोबा वस्तीवर 15 ते 20 बाबा एकत्र येऊन धिंगाणा घालत असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सचिव अमोल निकम यांना दूरध्वनीव्दारे माहिती मिळताच त्यांनी समिती अध्यक्ष तानाजी शिंदे व छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांना माहिती दिली. काही भोंदूबाबा पाण्यात राख टाकून दारू सोडविण्याचा तसेच मूलबाळ होण्याचा दावा करत नागरिकांची फसवणूक करत वस्तीवर धिंगाणा घालत असल्याची माहिती निकम यांनी पोलिसांना देताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. वाडिले यांनी पोलिसांसह रोकडोबा वस्तीवर छापा टाकला.

यावेळी समितीचे अमोल निकम, जितेंद्र वाघ उपस्थित होते. 15 ते 20 भोंदूबाबा स्थानिक नागरिकांशी अरेरावी करत असल्याचे दिसून आले. पोलिस आल्याचे लक्षात येताच या बाबांनी धूम ठोकली. मात्र आबा भगत या भोंदूबाबास पकडण्यास पोलिसांना यश आले. नागरिकांशी उध्दट वर्तवणूक करणार्‍या भोंदूबाबाचा पो. नि. वाडिले यांनी चांगलाच समाचार घेतला.

समिती अध्यक्ष शिंदे यांनी भोंदूबाबास प्रयोग करून दाखविण्याचे सांगताच बाबा गोंधळला व गयावया करु लागला. यावेळी पोलिसांतर्फे जादूटोणा करण्याचे साहित्य जमा करण्यात आले. भोंदूबाबाविरुद्ध महाराष्ट्र नरबळी अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी दाभाडीच्या निरंकार निकम, वसंत मोरे, शेखर पवार, गणेश निकम आदी कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

अनेक बाबा एकत्र करून संबंधित बाबाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. श्रद्धा निश्चित ठेवा पण ती अंधश्रद्धा नसावी असे आपल्या परिसरात भोंदूगिरी करणारे असतील तर पोलीसात तक्रार दाखल केली पाहिजे, असे आवाहन पो. नि. वाडिले यांनी केले आहे.

भोंदूबाबा हे अतीशय चलाख असतात. पाण्यात राख टाकून सर्व आजार दूर होतात, गुढी पाहणे, मुल बाळ होणे, श्रध्देचा फायदा घेऊन नकळत अंधश्रद्धेस खतपाणी घालून आर्थिक व मानसिक खच्चीकरण करतात. नागरिकांनी अशा भोंदूबाबा विरोधात तक्रारी दाखल कराव्यात.

तानाजी शिंदे ,अध्यक्ष-अंधश्रध्दा निर्मूलन

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com