आघाडीचा प्रयोग की स्वतंत्र पॅनल?

कृषी उत्पन्न बाजार समितीची आगामी निवडणूक
आघाडीचा प्रयोग की स्वतंत्र पॅनल?

येवला । सुनील गायकवाड Yeola

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा Yeola APMC Election रणसंग्राम आता सुरू होणार आहे. प्रारंभापासूनच काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. आता बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू असून उमेदवार चाचपणी केली जात आहे. या निवडणुकीतही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतो की महाविकास आघाडीचा प्रयोग होतो याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

27 जुलै 2015 रोजी या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अंबादास बनकर, अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांचा प्रगती पॅनल व सेनेचे संभाजी पवार, नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनल असा सामना रंगला होता. विकासाच्या मुद्यावर भुजबळांच्या प्रगती पॅनलला 18 पैकी 12 जागा मिळाल्या तर सेनेच्या पवार, दराडे यांच्या प्रतिस्पर्धी पॅनलला 6 जागांवर समाधान मानावे लागले होते.

या निवडणुकीत सोसायटी सर्वसाधारण - संजय बनकर (591), नवनाथ काळे (534), भास्कर कोंढरे (491), कृष्णराव गुंड (482), कांतीलाल साळवे (466), अशोक मेंगाणे (464), मकरंद सोनवणे (464), विशेष मागास प्रवर्ग - गणपत कांदळकर (529), महिला राखीव गट - उषा शिंदे (616), पुष्पा शेळके (452), इतर मागासवर्ग - मोहन शेलार (499). ग्रामपंचायत सर्वसाधार गट - संतू झांबरे (398), मनीषा जगताप (372), आर्थिक दुर्बल घटक - धोंडीराम कदम (384), अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग- राधाबाई गायकवाड (418), व्यापारी गट - नंदकिशोर अट्टल (205), सुभाष समदडिया (182), हमाल-मापारी गट- गोरख सुरासे (112) हे संचालक म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीनंतर सभापतिपदासाठी अ‍ॅड. माणिराव शिंदे यांच्या पत्नी उषा शिंदे यांना संधी मिळाली.

सन 1955 मध्ये शेतकरी हितासाठी स्थापन झालेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रत्यक्ष कामकाज मात्र 1957 मध्ये सुरू झाले. तालुक्यातील शेतकर्‍यांची अर्थवाहिनी ठरलेल्या येवला बाजार समितीचे आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या लासलगाव बाजार समितीपाठोपाठ नाव घेतले जाते. येवला तालुका कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा तालुका असल्याने कालौघात बाजार समितीही बहरत गेली. बाजार समितीच्या मुख्य आवारासह दोन उपबाजारही निर्माण झाले. तालुक्यात शेतकर्‍यांना शेतीमाल विक्रीसाठी चांगला पर्याय मिळाला. आजही लासलगावनंतर येवला बाजार समितीचेच नाव अग्रस्थानी आहे.

बाजार समिती आवारात भरणारा घोडेबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या घोडेबाजारामुळे सारंगखेड्यापासून थेट राजस्थान, कर्नाटकपर्यंत येवल्याचे नाव आहे.

राजकीयदृष्ट्या पाहिले तर बाजार समितीवर प्रारंभपासून काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. तर तालुक्यातील प्रमुख नेत्यांचे समजुतीचे राजकारणही बाजार समितीत पाहायला मिळाले आहे. येवला मतदारसंघात राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली आणि भुजबळांमुळे बाजार समिती राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आली.

निवडणुकीनंतर सेनेनेही बाजार समितीत विरोधाला विरोध न करता समजुतीचे राजकारण करत विकासाला साथ दिली. शिंदे यांनी आपल्या सभापतिपदाच्या कारकीर्दीत मुख्य बाजार आवार काँक्रिटीकरण, पाटोदा उपबाजार आवारावर लिलाल जागा काँक्रिटीकरण, रस्ते काँक्रिटीकरण, कार्यालय इमारत, तीन गोदामे, अंदरसूल उपबाजार आवारावर रस्ते काँक्रिटीकरण, दोन प्रवेशद्वार, एक गोदाम आदी कामे केली. बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपल्याने 18 डिसेंबर 2020 रोजी तत्कालीन सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांची बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. तर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तक्षेपाने बाजार समितीवर 8 मार्च 2021 पासून मुख्य प्रशासक वसंत पवार यांच्यासह 18 प्रशासकांचे अशासकीय प्रशासक मंडळ अस्तित्वात आले.

प्रशासक नियुक्तीत राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना व काँग्रेसलाही भुजबळ यांनी स्थान दिल्याने बाजार समितीत महाविकास आघाडी अस्तित्वात आली. प्रशासकीय मंडळाने बाजार समितीतील 64 वर्षांची परंपरा खंडित करत अमावस्येला बाजार लिलाव सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

जानेवारी 2022 मध्ये होणार्‍या बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने भुजबळ महाविकास आघाडीचा प्रयोग कायम ठेवतात की स्वतंत्रपणे राष्ट्रवादीचे पॅनल उभे करतात याकडे लक्ष लागून आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजपची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी सुरू झाली असून या निवडणुकीत अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांची राजकीय भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

Related Stories

No stories found.