दीड कोटी विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत

51 लाख विद्यार्थी अद्याप बाकी
दीड कोटी विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत

नाशिक । प्रतिनिधी

सर्व माध्यमिक व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार कार्डशी जोडले जात असून ‘सरल’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. 11 मे पर्यंतच्या राज्यातील एकूण 2 कोटी 15 लाख 76 हजार 500 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 64 लाख 75 हजार 900 विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आली आहे. अजूनही 51 लाख 618 इतक्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे बाकी आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत राज्यातील शाळांमधील आधार अद्ययावतीकरणाची प्रक्रिया पुढील निर्देशांपर्यंत स्थगित करण्यात आली असून, त्यासंबंधित आधार नोंदणी संच सुस्थितीत जतन करून ठेवण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.

दरम्यान, सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन ज्या जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा कमी कामकाज झाले आहे, त्या जिल्ह्यांचा शिक्षणाधिकार्‍यांकडून याबाबत खुलासा घेण्यात यावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.

नाशिक, पुणे, औरंगाबादची सरासरी कमी

राज्याच्या सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेले गडचिरोली, अमरावती, लातूर, परभणी, रायगड, अकोला, पालघर, नाशिक, वाशिम, पुणे, ठाणे, औरंगाबाद आदी जिल्हे आहेत. 90 टक्क्यांपेक्षा अधिक आधार अद्ययावतीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, भांडारा, वर्धा, जळगाव, गोंदिया, चंद्रपूर , बुलढाण्याच्या समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com