
मालेगाव । प्रतिनिधी Nashik
करोना उद्रेकाचा फटका शहरातील छोट्या व्यावसायिकांना बसला असून उत्पन्नाचे साधन ठप्प झाल्याने जमा पुंजी संपुष्टात आल्याने ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या मामको बँकेने या व्यावसायिकांना संकटातून बाहेर काढत परत उभे करण्यासाठी मामको आधार कर्जपुरवठा योजना सुरू केली आहे, अशी माहिती ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांनी दिली.
मामको बँकेतर्फे करोना उद्रेकामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात विस्कळीत झालेल्या व्यवसायामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या छोट्या व्यावसायिकांना परत उभे करण्यासाठी मामको आधार या लघु कर्ज योजनेचा शुभारंभ व्यावसायिकास कर्जाचा धनादेश चेअरमन अॅड. भरत पोफळे, व्हा. चेअरमन अॅड. संजय दुसाने यांच्यासह संचालकांच्या हस्ते देऊन करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना भोसले बोलत होते.
पारदर्शी कारभारामुळे सभासद, ठेवीदारांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरलेली मामको बँक तालुक्याची अर्थवाहिनी ठरली आहे. छोट्या व्यावसायिकांना आर्थिक आधार देत त्यांच्या प्रगतीला चालना देण्याचे काम आजतागायत बँकेने केले आहे. भूकंप, महापूर असो की करोना संकट सामाजिक बांधिलकी जपण्यात मामको अग्रेसर राहिली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ लाख २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिक, फेरीवाले, लॉन्ड्रीचालक, चहा व पान स्टॉल, बाजारहाट करणारे व्यावसायिक व भाजीपाला विक्रेते यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.
व्यवसाय बंद पडल्याने शिल्लक जमा पुंजी संपुष्टात आल्याने हे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देत दिलासा देण्यासाठी मामको आधार कर्जपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी प्रोत्साहन व पाठबळ मिळेल, असा विश्वास भोसले यांनी बोलताना व्यक्त केला.
मामको आधार लघु कर्ज योजनेत दैनिक अल्पबचत योजनेच्या माध्यमातून पावतीद्वारे कर्ज परतफेड करणार्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. छोट्या व्यावसायिकांसाठी ही योजना संजीवनी ठरेल, असा विश्वास जनरल मॅनेजर कैलास जगताप यांनी व्यक्त केला.
यावेळी संचालक सतीश कासलीवाल, भिका कोतकर, गौतम शाह, छगन बागुल, भास्कर पाटील, विठ्ठल बागुल, नाभिक समाज विश्वस्त चंद्रशेखर सोनवणे, शाखाधिकारी राजेंद्र वाघ आदी संचालक व व्यावसायिक उपस्थित होते.
२५ हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध
छोट्या व्यावसायिकांना आधार देण्यासाठी मामको बँकेतर्फे आधार कर्जपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. ५ ते २५ हजारांपर्यंत अल्पमुदतीचे हे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास चेअरमन अॅड. भरत पोफळे यांनी व्यक्त केला.