नाशिक। प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना संसर्ग वाढत असतांना रुग्णांना खाटा मिळत नाही, ऑक्सजन, व्हेंटीलेटर खाटा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर येत असतांना लोकप्रतिनिधी देखील यासंदर्भातील जबाबदार अधिकार्यांना जाब विचारत आहे. महापालिकेच्या करोना उपचार व्यवस्थापनेतील अनास्थेचा एक बळी गेल्याचे आज समोर आले आहे.

खाट मिळत नसल्याची तक्रार करीत महापालिकेच्या आतील प्रवेशद्वारासमोर सिलेंडरसह आलेल्या रुग्णांचा मृत्यु झाल्याचा संतापजनक प्रकार आज समोर आला. याप्रकारामुळे नाशिक महापालिकेतील करोना रुग्णांच्या आरोग्य सेवेतील त्रुटींचे भीषण वास्तव समोर आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी व प्रशासनाला लक्ष करण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान या प्रकाराला स्टंटबाजीची झालर असल्याचा आरोप होत असुन यासंदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन एका सांमाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु झाला आहे.

नाशिक महपाालिका क्षेत्रात गेल्या मार्च महिन्यात 33 हजार 559 हजार नवीन रुग्ण वाढले असुन सध्या प्रति दिन दीड हजारावर नवीन रुग्णांची भर पडत असल्याने आता आरोग्य सेवा व्यवस्था कमी पडत असल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे. आजमितस शहरात 16 हजाराच्यावर रुग्ण उपचार घेत असुन यातील बहुतांशी रुग्ण घरी राहुन उपचार घेत आहे. यातच आता घरी असलेल्या रुग्णांची प्रकृती बिघडू लागल्यानंतर त्यांना ना मनपा व ना खाजगी रुग्णालयात खाटा मिळत आहे. नाशिक महापालिकेकडुन बिटको, डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयांतील कोविड रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढलेली नसुन उपलब्ध खाटा भरल्या आहे. यामुळे आता रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेत ऑक्सीजन सिलेंडरसह येऊन बसलेल्या करोना संशयित बाबासाहेब तातेराम कोळे (वय 38वर्ष ) (मुळ रा. नेर जि. जालना) हल्ली रा. कामटवाडे डीजीपीनगर यांचा उपचार सुरु असतांना बिटको रुग्णालयात आज सकाळी मृत्यु झाला. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असतांना त्यास याठिकाणी आणत स्टंटबाजी करण्यात आल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप प्रशासनाकडुन करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मृत कोळे यांना महापालिका कार्यालयात आणणारे दीपक डोके यांच्या विरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. असे असले तरी या प्रकारामुळे प्रशासन यंत्रणा व लोकप्रतिनिधी खडबडुन जागी झाली आहे.

गेल्या महिन्यात 33 हजारावर नवीन रुग्ण वाढले असुन या वेगाने महापालिका प्रशासनाकडुन व्यवस्था झाल्याचे दिसुन येत नसल्याने महापालिकेवर अपयशाचा आरोप आता विरोधकांकडुन केला जात आहे.

बेड शिल्लक नव्हता, असे नाही

मनपा प्रवेशद्वारजवळ ऑक्सीजन सिलेंडरसह आलेल्या आंदोलनकर्त्यांचा मृत्यु झाल्याची घटना दुदैवी अशीच आहे. तो जेव्हा महापालिकेत आला तेव्हा मनपा रुग्णालयात बेड शिल्लक नव्हता असे नाही, त्याला याठिकाणी आणण्याऐवजी रुग्णालयात न्यायला हवे होते. त्याची ऑक्सीजन लेव्हल 35 - 36 पर्यत गेली, त्याला अॅडमीट करायला हवे होते. महापालिका प्रशासनाकडुन 115 रुग्णालयात रुग्णांची सोय करण्यात आली असुन गेल्या 2 दिवसात 650 ते 700 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. करोना रुग्णांसाठी 1000 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना मदत व्हावी व जनजागृती व्हावी याकरिता आपण सर्व नगरसेवकांशी चर्चा केली आहे. या संकटावर मात करण्याची जबाबदारी एकट्या महापालिकेची नसुन सर्वाची आहे.

- सतिश कुलकर्णी, महापौर

हा स्टंटबाजीचा प्रकार ; चौकशी सुरु

मृत कोळे रुग्णांच्या नातेवाईकांनी खाटा उपलब्ध आहेत कि नाही यासंदर्भात सीबीआरएसकडे कोणतीही चौकशी केलेली नाही. तरींही याप्रकाराची व रुग्णांच्या मृत्युसंदर्भातील सर्व चौकशी करण्याचे आदेश आपण प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना दिले असुन अहवाल 2 दिवसात देण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकार स्टंटबाजीचा दिसत असुन महापालिकेत आलेल्या दोन रुग्णांपैकी कमी वयाने असलेला रुग्णाला बेडची आवश्यकता असतांना बिटको रुग्णालयातून निघुन गेला असुन एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. तर दुसरा रुग्णांची प्रकृती गंभीर असतांना त्याला रुग्णालयात न नेता त्यांना महापालिकेत आणले, ज्या व्यक्तीने त्यांना आणले तो त्यांचा नातेवाईक देखील नाही. हा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. त्याने रुग्णालयात नेण्याऐवजी महापालिकेत आणुन स्टंयबाजी करुन रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चुकीचा आहे. यामुळे जिल्ह्याची बदमानी होत असुन हा घृणास्पद प्रकार आहे. यामुळे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असुन पोलीसांच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल.

- कैलास जाधव, महापालिका आयुक्त

महापालिकेची इभ्रत वेशिवर टाकली गेली

बाबासाहेब कोळे यांचा मृत्यु ही अत्यंत दुदैवी घटना आहे. यातून नाशिक महापालिकेची इभ्रत वेशिवर टांगली गेली आहे. त्यांच्या कालच्या आंदोलनाच्या पवित्र्यात येण्यापुर्वी तो नाशिकरोड बिटको व डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात जाऊन आला होता, त्याला बेड मिळाला नाही म्हणुन उद्विग्न होऊन नाशिक मनपाच्या गेटवर आला होता. तेव्हा आयुक्त कैलास जाधव यांच्यासोबत मी स्वत: बोललो. त्यांनी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिली व त्याला दाखल देखील करुन घेण्यात आले. दाखल करतांना ऑक्सीजन लेव्हल 36 होती, त्याला व्हेंंटीलेटरची गरज होती. ही व्यवस्था न करता त्याला ऑक्सीजनवर ठेवण्यात आले, त्यामुळे त्याचा मृत्यु झाला आहे. हे महापालिकेचे अपयश आहे.किती लोक मृत्यु होत आहे, त्याचा आकडा काढणे गरजेचे आहे. आज अमरधामची स्थिती वाईट आहे, व्हेंटीलेटर मिळत नाही, आक्सीजन अभावी मृत्यु होत असुन नाशिक शहरावर संकट निर्माण झाले आहे. व्हेंंटीलेटर ऑपरेटर नाही व इतर तंत्रज्ञाचा स्टाफ महापालिककडे नाही.

- सुधाकर बडगुजर, माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना महानगरप्रमुख

बाहेर जिल्ह्यातील रुग्णचा शहरावर ताण

जिल्ह्याबाहेरील जालना, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, जळगांव येथून नाशिक शहरात उपचारासाठी येणारे करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्या त्या जिल्ह्याने करोना रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी पार पाडली तर नाशिक शहरावरील ताण कमी होऊन चांगल्या प्रकारे उपचार करता येणार असल्याची प्रतिक्रीया महापालिकेचे प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.

चाचण्या विलंबामुळे मोठा धोका

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मनपाच्या अनेक आरोग्य केंद्रावर कोरोना चाचण्या होत आहेत. परंतू या चाचण्यांच्या रिपोर्ट मिळण्यास मोठा उशीर होतो आहे. या रिपोर्टसाठी साधारणतः 2 ते 5 दिवस लागत आहे. माझ्या माहितीनुसार जवळपास 35 ते 40 टक्के चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. कोरोनाच्या ह्या चाचण्यांची संख्या मोठी असल्याने असे काही रुग्ण रिपोर्ट च्या प्रतीक्षेत निर्धास्त जीवन जगत आहेत. त्यामुळे समाजजीवनाचा धोका वाढतो आहे. या विषयात तातडीने लक्ष घालून मनपाच्या माध्यमातून होणार्या करोना चाचण्यांचे अहवाल तातडीने मिळण्यासाठी उपाययोजना करावी.

- प्रा.डॉ.वर्षा अनिल भालेराव, नगरसेविका.

करोनाची बाधा होऊ नये म्हणुन शरिरात प्रतिकार शक्ती निर्माण करण्याची गरज असुन याकरिता सर्वांनी आयुर्वेद व होमिओपॅथीची औषधे वैद्यकिय सल्ल्याने घेण्यासाठी जनजागरण होणे आवश्यक आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यासांठी दररोज किमान अर्धा - एक तास नित्यनियमाने प्राणायम व योगा करणे आवश्यक आहे.

- महापौर सतिश कुलकर्णी