
पंचवटी । प्रतिनिधी Panchavati
गोदावरी नदीवरील ( Godavari River )गोदा घाटालगत संत गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर पूल दरम्यान शाही मार्ग तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीने कोट्यवधी रुपयांचा निधी वापरून रस्ता दुभाजक, पथदीप, डांबरीकरण, सिमेंटची जाळी, संरक्षण भिंत, भुयारी व पावसाळी गटार तसेच केबलसाठी पाईप अशा विविध सुविधांसह सुशोभीकरण केले आहे. परंतु सर्व कामे झाल्यानंतर या रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यालगत काटेरी झाडे, झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत शाही मार्गाचा विकास करण्यात आला आहे. या रस्त्याच्या उत्तरेकडून काटेरी झुडपे वाढत ते थेट रस्त्यावर आली आहेत. पावसाळ्यात या काटेरी झुडपांची वाढ चांगलीच झालेली आहे. यामुळे या मार्गावर मार्गक्रमण करणार्या वाहनांच्या दृष्टीने धोकादायक बनले आहे. पथपदावर झोपड्यांचे अतिक्रमण देखील प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या रस्त्याला काटेरी झुडपांमुळे व दुसर्या बाजूला झोपड्यांमुळे विचित्र दर्शन होत आहे. दिवसभरातून विविध राज्यातून व देशभरातून लाखो भाविक या रस्त्याने ये-जा करत असतात. सर्व पर्यटकांना व भाविकांना विचित्र दर्शन होत आहे.
सिमेंट काँक्रीटच्या कुंड्यादेखील या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. मात्र त्या कुंड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याऐवजी कचरा टाकण्यात येत आहे. पंचवटी परिसरातील जुना गावठाणचा भाग गणेशवाडी या परिसरातील अरुंद रस्ते भरणारा भाजी बाजार, हातगाड्यांचे अतिक्रमण दुचाकी व चारचाकी वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून नवीन शाहीमार्ग सोयीचा आहे. भाविक पर्यटन स्थळावर येणारी वाहने तपोवनााकडे जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करीत असतात. या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.