
बोलठाण । वार्ताहर Bolthan
नांदगाव तालुक्यातील ( Nandgaon Taluka )घाटमाथा परिसरातील सर्व रस्त्यांची अपुर्ण कामे ( Road Works )बांधकाम विभागातर्फे तात्काळ सुरू करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी बोलठाणसह घाटमाथ्यावरील सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला. सर्वच व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे व्यापारीपेठा, बाजारांमध्ये शुकशुकाट पसरला होता. कुठलाही अनुचित प्रकार न घडता घाटमाथा बंद शांततेत पार पडल्याने पोलीस-प्रशासन यंत्रणेस दिलासा मिळाला.
घाटमाथ्यावरील बोलठाणसह परिसरातील गावातील रस्त्यांची कामे अपुर्ण आहेत. वारंवार मागणी करण्यात येवून देखील रस्त्यांची कामे पुर्ण केली न जाता 2018-19 मधील मंजूर कामे 2023 ला प्रारंभ होत असला तरी पुर्ण झाले नाहीत. रस्त्यांची कामे तात्काळ सुरू होण्याच्या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे 16 जानेवारीपासून बेमुदत आंदोलनास प्रारंभ करण्यात आला आहे.
चौथ्या दिवशीही संघटनेचे हे आंदोलन सुरूच होते. आंदोलनास प्रारंभ होताच पहिल्याच दिवशी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी भेट देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र या मागे देखील हजारो ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय लक्षात न घेता ठेकेदारास वेळ मिळावा अशीच भुमिका असल्याने आंदोलनकर्त्यांसह ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते.
या आंदोलनात बोलठाणसह जवळकी, गोंडेगाव, जातेगाव, ढेकू, कुसूमतेल, रोहिलासह इतर गावातील ग्रामपंचायतीतर्फे समर्थन देण्यात आले होते. रस्त्यांची कामे आंदोलन सुरू होवून देखील सुरू होण्याबाबत काहीच हालचाल होत नसल्याने बोलठाणसह घाटमाथ्यावरील गावांमध्ये स्वयंस्फुर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सकाळपासूनच सर्व व्यापारी, दुकानदार या बंदमध्ये सहभागी झाल्याने गावांमध्ये शुकशुकाट पसरला होता.
घाटमाथ्यावरील अपुर्ण रस्त्यांच्या समस्येस सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे. ठेकेदारास वेळोवेळी पाठीशी घालण्याचे काम अधिकारी करत आहेत. यामुळेच हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. गावागावात कडकडीत बंद पाळण्यात येवून या विषयाच्या गंभीरतेकडे सर्व ग्रामस्थांनी देखील लक्ष वेधले आहे. या आंदोलनाची दखल घेतली न गेल्यास अधिक तीव्र आंदोलन यापुढे छेडले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी यावेळी बोलतांना दिला.
रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे घाटमाथ्यावरील मुलांचे लग्न थांबले आहेत तर काहींची मोडली आहेत. ही समस्या लक्षात घेता अधिकार्यांनी रस्त्याचे काम पुर्ण करत सहकार्य करावे, अशी अपेक्षा अमित जैन यांनी व्यक्त केली तर ग्रामीण बाजारपेठेचे बोलठाण हे प्रमुख गाव असतांना देखील मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी आंदोलनाची वेळ येत असल्याबद्दल बाळासाहेब चव्हाण यांनी खंत व्यक्त केली. चौथ्या दिवशीही आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.