नाशिक । प्रतिनिधी Nashik

कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ हटविण्यात यावी,या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शुक्रवारी ( दि.४) राज्यातील सर्व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे.कांद्याला सद्य स्थितीत मिळणारा भाव हा उत्पादन खर्च पाहता परवडणारा नाही.त्यामुळे कांदा पीक घेणेही परवडत नाही.त्यातच केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केलेली आहे.त्यामुळे कांदा निर्यातबंदी तात्काळ हटवावी,या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने शुक्रवारी ( दि.४) सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने 14 सप्टेंबर 2020 रोजी एक दिवसात कांदा निर्यातबंदी केली. त्यातच परदेशी कांदा आयात करून कांद्यावर एकापाठोपाठ एक निर्बंध घातले. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव कोसळत असून कांदा उत्पादकांना मोठया आर्थिक नुकसानीला सध्या सामोरे जावे लागत आहे. आता तर कांद्याचे दर प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार रुपयांपेक्षाही कमी झाल्याने केंद्र सरकारने परदेशी कांदा आयात करणे शंभर टक्के बंद करावे.

कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी आणि राज्यातील कांदा उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे,अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यात रेलरोको,रास्तारोको आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही तहसीलदार यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.