
नाशिक । प्रतिनिधी Nashik
अन्न व औषध प्रशासनाने ( Food and Drug Administration) आता रेस्टॉरंट चालकांकडे मोर्चा वळवला असून खाद्यतेल (Edible oil) काळे होईपर्यंत त्यात खाद्यपदार्थ तळणार्या व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा अन्न औषध प्रशासनाद्वारे देण्यात आला आहे.
पावसाळ्यात वडापाव, पाववडा, भजी आदी तळलेल्या खाद्यपदार्थांची मागणी वाढते. शहरातील हातगाड्या, हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात या पदार्थांचा पुरवठा केला जातो. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 1 जुलैपासून शहरातील अशा आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार असून हलगर्जीपणा करणार्या व्यावसायिकांवर थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा अन्न औषध प्रशासनाने दिला आहे.
हातगाड्यांसह छोट्या दुकानांमध्ये एकाच तेलात अनेकदा पदार्थ तळतात. खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकदा घेतलेले तेल कमाल तीनदा वापर करायला हवे. त्यानंतर तेल बदलायला हवे. मात्र खर्च वाचवण्यासाठी याबाबत अनेकांकडून हलगर्जीपणा केला जातो. काही व्यावसायिक तेल काळे होईपर्यंत वापर करताना दिसतात. ते नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक आहे.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून 1 जुलैपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून असे वापरल्या जाणार्या तेलांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. त्यात दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
रस्त्यावरील हातगाड्या, दुकाने, हॉटेल्स, स्वीट मार्ट, रेस्टॉरंट यांची तपासणी केली जाणार आहे. त्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. त्यांचे पोलर कंपाऊंडस् (टीपीसी) मीटरद्वारे तपासणी केली जाणार आहे. दोषी विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आला आहे.
128 दुकानांतून होते तेल जमा
तळून काळ्या झालेल्या तेलात पुन्हा पदार्थ तळले जाऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारकडून काही एजन्सी नेमण्यात आल्या असून त्यांच्याकडून हे तेल जमा केले जाते. नाशिक शहरातून सध्या 128 दुकानांतून असे तेल नियमित जमा केले जात आहे. काही बड्या आस्थापनांमध्ये तर टीपीसी मीटरच ठेवण्यात आले असून तेलातील टीपीसी वाढल्यानंतर त्यात ताजे तेल मिसळले जाते.
टीपीसी मीटरद्वारे तपासणी
खाद्य सुरक्षा तथा मानक प्राधिकरणाच्या रिपर्पज युज्ड कुकिंग ऑईल (रुको) या उपक्रमांतर्गत 1 जुलैपासून खाद्यपदार्थ तळल्या जाणार्या तेलाची टीपीसी मीटरद्वारे तपासणी केली जाणार आहे. विक्रेत्यांनी तळणासाठी एकाच तेलाचा तीनपेक्षा अधिक वेळा वापर करू नये.
- गणेश परळीकर, सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन