महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच

पुणे-इंदूर महामार्गाची दुरवस्था; दोन महिन्यात 45 अपघात
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच

मनमाड । बब्बू शेख Manmad

खड्ड्यांमुळे शहरातून जाणार्‍या पुणे-इंदूर महामार्गावर ( Pune-Indore highway )अपघातांची मालिका ( accidents ) थांबण्याची चिन्हे दिसत नसून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहरवासियांसह वाहनचालकांतर्फे व्यक्त केली जात आहे. गत दोन महिन्यात या महामार्गावर तब्बल 45 अपघात होऊन सात निरपराध नागरिकांचा बळी तर अनेकांना जायबंदी व्हावे लागल्याची माहिती सूत्रांतर्फे देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या महामार्गावरून जाणार्‍या वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात असल्याने रस्ता दुरूस्त करण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे. मात्र महामार्गाची चाळण झालेली असतानादेखील रस्ता दुरूस्त का केला जात नाही? असा प्रश्न नागरिक आणि वाहनधारकांनी केला आहे.

दरम्यान, आज महामार्गावरील खड्डा चुकवताना मोटारसायकलवर बसलेली महिला खाली पडून ट्रकखाली सापडल्याने गंभीररीत्या जखमी झाली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने नाशिकला हलवण्यात आले. सदर महिला गर्भवती असल्याचे समजते. पतीसोबत मोटारसायकलवरून जात जाताना खड्डा चुकवताना रेल्वे ओव्हर ब्रीजवर हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून महिलेचा पती थोडक्यात बचावला.

मुकेश जाधव (26), काजल जाधव (21, दोघे राहणार श्रावस्तीनगर) हे दापत्या मोटारसायकलवरून जात असताना रेल्वे ओव्हर ब्रीजवर खड्डा चुकवताना दोघे खाली पडले आणि मागून येणार्‍या ट्रकच्या पुढच्या चाकाखाली काजल सापडली. अपघात होताच नागरिकांनी धाव घेऊन ट्रक मागे केल्यानंतर जखमी काजलला तातडीने उपजिल्हा रुगणालयात दाखल करण्यात आले असता येथे प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती नाजूक असल्यामुळे तिला नाशिकला पाठवण्यात आले.

पुणे-इंदूर हा महामार्ग शहराच्या मध्य भागातून जात असून या मार्गावर चोवीस तास वाहतुकीची वर्दळ असते. मालेगाव ते कोपरगावपर्यंत हा मार्ग टोल कंपनीने 2018 साली तयार केला असून या मार्गावरून जाणार्‍या प्रत्येक वाहनधारकाकडून 2025 पर्यंत टोल वसूल केला जाणार आहे. एका दिवसात सुमारे 10 लाख रुपये टोल वसूल केला जात असून रस्ता खराब झाल्यावर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे.

सध्या या महामार्गावर इतके खड्डे झालेले आहेत ( Pits on the highway )की त्याच्यावरून वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. खड्ड्यांमुळे गेल्या दोन महिन्यात तब्बल 45 छोटे-मोठे अपघात झाले असून त्यात सात निरपराध नागरिकांचा बळी गेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. एकीकडे या महामार्गाची चाळण होऊन तो वाहनधारक आणि नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असताना दुसरीकडे मात्र टोल कंपनी रस्ता दुरूस्त करत नसल्याचे पाहून टोल कंपनीवर कोणाचा वचक आहे की नाही? आणखी किती लोकांचा बळी गेल्यानंतर रस्ता दुरूस्त केली जाईल? असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com