
नाशिक | Nashik
अशोका स्कूलमध्ये यंदा पहिल्यांदाच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा (ऑस्टेल्जिया २०२२), २३ डिसेंबर २०२२ रोजी अशोका युनिव्हर्सल स्कुलच्या अशोक मार्ग शाखेत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भारतभरातल्या जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. २०१२ पुढील सर्व बॅचेसमधील विद्यार्थी व शिक्षकांनी सुवर्णस्मृती जागृत करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
या प्रसंगी विशेष सांकृतिक कार्यक्रमात ग्लॅमरस रेड कार्पेट थीमचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शानदार पद्धतीने रेड कार्पेटद्वारे करण्यात आले, फ़ोटो काढत आणि मुलाखती घेत माजी विद्यार्थ्यांना सिने तारे-तारका असल्याचा अनुभव करवून देण्यात आला. शाळेने केलेल्या या विशेष स्वागताने सर्वच विद्यार्थी भारावून गेले आणि शाळेतील जुन्या स्मृतीत हरवून गेले.
विविध क्षेत्रात महत्वाच्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती देत मनोगत व्यक्त केले व संवाद साधला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मेजवानीचा देखील आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.