वारकरी भवनात साकारली धार्मिक अभ्यासिका

वारकरी भवनात साकारली धार्मिक अभ्यासिका

सिन्नर । विलास पाटील | Sinnar

शहराच्या सौंदर्यात भर घातलेल्या विजयनगर भागातील नगर परिषदेच्यावतीने (nagar parishad) साकारलेल्या श्री विठ्ठल मंदिर व वारकरी भवनाच्या (varkari Bhavan) आवारात माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या 8 लाखांच्या देणगीतून धार्मिक ग्रंथालय (Religious library) व अभ्यासिका उभी राहिली आहे.

पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) वारकरी भवनाच्या शेजारीच संत निवासासाठी दोन खोल्या बांधण्यात आल्या असून त्याच्या वर ग्रंथालय व अभ्यासिका साकारण्यात आली आहे. त्यासाठी राजाभाऊंनी आपल्या आजी श्रीमती मथुराबाई शंकरराव वाजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 8 लाखांच्यावर खर्च केला आहे. जवळपास 560 स्क्वेअर फूटाच्या या अभ्यासिकेत सव्वा लाख खर्चून भिंतीलगत शोकेस बनवण्यात आली असून त्यात ज्ञानेश्वरीपासून शेकडो धार्मिक ग्रंथ ठेवण्यात आले आहेत.

सिन्नर (sinnar) सार्वजनिक वाचनालयाने (Public Libraries) काही धार्मिक ग्रंथ या अभ्यासिकेसाठी भेट दिले आहेत. तर काही धार्मिक ग्रंथ खास पंढरपूरहून खरेदी करण्यात आले आहेत. मागणीप्रमाणे इतर धार्मिक ग्रंथही आणले जाणार आहेत. ज्ञानेश्वरीसह इतरही धार्मिक ग्रंथाचे पारायण करण्याची व्यवस्था या अभ्यासिकेत करण्यात आली आहे. एकाचवेळी 12-15 अभ्यासकांना बसण्यासाठी खास पाट, ग्रंथ ठेवण्यासाठी पोथीपाट, चौरंगही बनवण्यात आले आहेत.

अभ्यासिकेत अंथरण्यासाठी तीन सतरंज्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अभ्यासिकेसाठी तबला, पेटी, मृंदुग, टाळही खरेदी करण्यात आले आहेत. भजने शिकण्याची तयारी असणार्‍यांसाठी खास वर्गही इथे चालावेत अशी राजाभाऊंची संकल्पना आहे. भजनांसह ही सर्व वाद्य शिकवण्याची तयारी काही संगीत तज्ञांनी दाखवली असून त्यासाठी वेळ देण्याचा शब्दही त्यांनी दिला आहे.

अभ्यासिकेत संत सेना महाराज, सोपानदेव, बोधले महाराज, संत गोरोबा काका, निवृत्ती महाराज, नामदेव महाराज, नरहरी सोनार, एकनाथ महाराज यांची चित्रे लावण्यात येणार आहेत. सेवानिवृत्त कला शिक्षक पी. टी. जाधव यांच्या कुंचल्यातून या संतांची चित्रे चितारली जात आहेत. टप्प्या-टप्प्याने संतासोबतच वारकरी धर्माची पताका उंचावत ठेवणार्‍या महनीय व्यक्तींचे फोटोही अभ्यासिकेतल्या भिंतीवर चितारण्यात येणार आहेत. पंढरपूरच्या चंद्रभागेसह विठ्ठल मंदिर परिसराचे चित्रही यात लक्षवेधक ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com