विनाहेल्मेट पेट्रोल भोवणार; ‘इतक्या’ चालकांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरटीओकडे

विनाहेल्मेट पेट्रोल भोवणार; ‘इतक्या’ चालकांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरटीओकडे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी (Independence Day) सुरु केलेल्या नो हेल्मेट नो पेट्रोल (No Helmet No Petrol) या मोहिमेंतर्गत १५ ते २८ ऑगस्ट या कालावधीत पेट्रोल पंपावर (Petrol Pump) विनाहेल्मेट पेट्रोल घेण्यासाठी अर्ज भरून देणाऱ्या ७२ दुचाकी चालकांनी खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आहे...

त्यामुळे या दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) कारवाई करत घरी जाऊन नोटीस बजावली आहे. या चालकांचा परवाना (License) निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

तसेच या चालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत न्यायालयात दंडात्मक कारवाई होणार असल्याचे पोलीस सहाय्यक आयुक्त सीताराम गायकवाड (Sitaram Gaikwad) यांनी दिली आहे.

नो हेल्मेट नो पेट्रोल या उपक्रमास १५ ऑगस्ट या दिवशी प्रारंभ झाला. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी या उपक्रमास संमिश्र प्रतिसाद मिळाला. पंपावर हेल्मेटची अदलाबदल करत पेट्रोल घेत असल्याचे निदर्शनास आले.

तसेच काही पंपचालक विनाहेल्मेट पेट्रोल विक्री करत असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्तांना प्राप्त झाल्याची दखल घेत आयुक्त दीपक पांडेय यांनी चालकांवर कोरोना साथरोग कायद्यांतर्गत आणि पेट्रोल देणाऱ्या पंपचालकांवर कारवाईचा इशारा दिला होता.

पंपचालकांना विनाहेल्मेट पेट्रोल घेणाऱ्या चालकांकडून अर्ज भरून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिंडोरी रोडवर (Dindori Road) एका पंपावर विनाहेल्मेट पेट्रोल देत नसल्याच्या कारणातून पंप कामगारांना मारहाण केली होती.

याची दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी पंपांवर पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. यामुळे पंपावर विनाहेल्मेट पेट्रोल देणे पूर्णपणे बंद करण्यात आल्याने हेल्मेट वापर करणाऱ्या चालकांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले.

अनेक चालकांनी खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे. न्यायालयाकडून मोटार वाहन नियम कायद्यांतर्गत समन्स बजावत दंडात्मक कारवाई होणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा.

- दीपक पांडेय, पोलीस आयुक्त

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com