सूर विश्वासातून स्वरांची आनंददायी बरसात

सूर विश्वासातून स्वरांची आनंददायी बरसात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वरांचे दीपावलीच्या आनंदात द्विगुणित करणारे स्वर आणि जीवन जगण्याचे तत्व सांगणारे शब्द स्वरातून निथळत होते. मानवी नाती आणि उत्सव यांचे अनोखे मैत्र उलगडून दाखवणारी ही मैफल रसिकांना आनंदी क्षणांची भेटच होती. मैफिलीला पाचशेहून अधिक रसिकांची तुडूंब गर्दी झाली होती.

विश्वास ग्रुपतर्फे सुरविश्वास ‘स्वर दीपावली’ या मैफिलीचे आयोजन विश्वास गार्डन येथे करण्यात आले होते. दिवाळीचा आनंद स्वरांसोबत साजरा करण्यासाठी विश्वास ग्रुपतर्फे अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले.

सुप्रसिद्ध गायक पंडित डॉ. अविराज तायडे, ज्ञानेश्वर कासार, मधुरा बेळे यांचे गायन नव्या पिढीतील क्षितिजा शेवतकर (सतार) व राजेश्वरी रत्नपारखी (बासरी) यांची फ्युजन जुगलबंदी रंगली. त्यांना नितीन वारे (तबला), नितीन पवार (तबला), संस्कार जानोरकर (संवादिनी) व पार्थ शर्मा (गिटार), प्रसाद भालेराव, (तालवाद्य) ओंकार कडवे (तानपुरा ) यशवंत केळकर (तानपुरा) आर्या गायकवाड (गायन साथ) यांनी साथसंगत केली तर सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.

मैफिलीचे हे एकोणीसावे पुष्प होते विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. अविराज तायडे यांनी मैफिलीची सुरुवात राग बैरागी भैरवने केली. बडा ख्याल व शब्द होते पियाके घर आणि त्यानंतर छोटा ख्याल सावरीया घर नही आये, प्रेम, भक्ती, आसक्ती यांची हळवी जाणीव आर्ततेने त्यांनी सादर केली. प्रेमातील शुद्धता आणि समर्पण याचे दर्शन त्यातून समोर आले. त्यानंतर बैरागी भैरव रागावर निर्गुणी भजन सादर केले. मन रे पढ हरिनाम की गीता ईश्वर भक्ती ही जीवन जगण्याचा सकारात्मक मार्ग सांगते याचा हा स्वरमंत्र होता.

ज्ञानेश्वर कासार यांच्या स्वरातून ओंकार स्वरुपाचे सूर भक्तीचा मना मनात मळा फुलवणारे होते. परमेश्वर भक्तीची हाक प्रत्येकाला आपली वाटणारी होती. या गीतानंतर भूपेश्री रागावर आधारित निर्गुणी भजन सादर केले. हिरना समझबुझ ही रचना सर्वांना भिडणारी होती. मधुरा बेळे यांनी तरल स्वरातून अभंग रचना सादर केल्या ,त्यात सुरुवातीला राग तोडीवर आधारित नाट्यपद म्हटले, सोहम हर डमरू हे शब्द होते.त्यानंतर राग ललत वर आधारित ’ समाधी हरिची अभंगाचे गायन केले.

मैफिलीचा शेवट क्षितिजा शेवतकर ( सतार) व राजेश्वरी रत्नपारखी ( बासरी ) यांच्या फ्युजन ने झाला.विविध रागातील सहजता आणि त्यातून निघणारी सुरेल जुगलबंदी वाद्य संगीताची सुरेल अनुभूती होती.

कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, ग्रंथ तुमच्या दारी, ग्रंथ तुम्हारे द्वार , आर्क ऑडिओ.यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. विश्वास ठाकूर म्हणाले की ,रसिकांची मिळणारी दाद ही कायमच कलावंताला बळ देणारी असते,त्यातून कलावंताची कला लोकाभिमुख होते तोच विचार या मैफीलीमागे आहे.

विपुल पाठक ,डॉ देवेंद्र चौधरी यांचा सन्मान अविनाश भिडे,डॉ.शंकर बोर्हाडे,प्राचार्य दर्शना देसाई,कवी ,नरेश महाजन,विवेक केळकर,घनशाम येवला,रमेश देशमुख,नितीन महाजन,एम एम पाटील, डॉ.नलिनी बागुल,डी जे हंस वाणी, डॉ.स्वाती भडकमकर,ज्योती ठाकूर, आर डी मोरे यांचे हस्ते करण्यात आले.

चैतन्याचे सूर पिंपळपारावर दरवळणार

संस्कृती नाशिकची पाडवा पहाट बुधवार दि.26 आक्टोबर रोजी पहाटे5 वाजता साजरी होणार आहे. पिंपळपार, नेहरुचौक, नाशिक येथे होणार्या या पडावा पहाट शास्त्रीय गायनाच्या मैफलीचे यंदा ं 24 वें वर्ष आहे. नाशिकच्या स्वांस्कृतिक वैभवाची साक्ष यंदाही देणार आहे..! स्वरमंचावर पं. मधूप मुद्गल यांच्या गायकीचा आविष्कार नाशिककर रसिकांना अनुभवता येणार आहे. असे संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैर यांनी कळविले आहे.

दीपावलीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दीपावलीनिमित्त दीपावली पहाट व दीपावली संध्या होणार आहे. लखलख चंदेरी असे नाव त्यला दिले असून यातील पहिला नाशिक येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. डॉ. गणेश चंदनशिवे, आकांक्षा कदम, समाधान आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. संजीव चिम्मलगी, केतन पटवर्धन, मधुरा कुंभार आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com