
नाशिक । प्रतिनिधी Nashik
कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून पकडून पांजरापोळमध्ये ठेवलेल्या तब्बल 111 उंटांचा अखेर आज तब्बल 16 दिवसांनी राजस्थानकडे प्रवास सुरू झाला.
सध्या पांजरापोळ येथे मुक्कामी असलेले उंट शेकडो किलोमीटर चालल्याने व भूकमारीमुळे त्यांना अशक्तपणा आला होता. यातच तब्बल 12 उंटांना आपला जीव गमवावा लागला.त्यांच्या मृत्यूची संख्या लक्षात घेत प्राणीमित्रांसह पांजरापोळ संस्थेने सदर उंट राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार केला होता. यानंतर राजस्थान येथील महावीर उंट अभयारण्य, सिरोही,या संस्थेने सदर उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकार्यांना पाठवले होते.यानुसार राजस्थान येथून उंटांना सांभाळणारे सात रायका गुरुवारी (दि.18) पांजरपोळ येथे दाखल झाले होते. शुक्रवारी (दि.19) सकाळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गिरीश पाटील, डॉ. वैशाली थोरात, डॉ . साखरे यांनी पांजरपोळ येथे भेट दिली.
यानंतर व्यवस्थापक विठ्ठल आगळे व सागर आगळे यांना पत्र मिळाले. जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र रायकांना दिल्यानंतर उंट राजस्थानकडे रवाना झाले. रायका हे उंट वणी मार्गे घेऊन जाणार आहेत. यात दररोज वीस ते पंचवीस किलोमिटर प्रवास करणार आहे. पंचवीस दिवसांत राजस्थान येथे उंट पोहोचतील अशी माहिती रायका यांनी दिली.
उंटांविषयी सर्वकाही
* उंट साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षे जगतो. पूर्ण वाढ झालेल्या उंंटाची उंची साधारणपणे वाशींडांना धरून सात फूटांपेक्षा जास्त असते.
* उंटाचा वेगाने धावण्याचा वेग पासष्ट कि.मी. प्रति तास असतो. तर लांबवर पल्ला गाठण्याचा वेग चाळीस कि.मी. प्रति तास असतो.
* उंट अन्न चरबीच्या रूपात वाशींडांमध्ये साठवून ठेवतो आणि अन्नाची कमतरता आल्यावर त्यातून गरज भागवतो. उंटांच्या लाल पेशीचा आकार अंडाकृती असतो यामुळे कमी पाणी शरीरात असतांनाही त्या कार्यरत राहतात.
* भारतातही राजस्थानमध्ये आढळणारे उंट हे मुख्यतः माणसाळवले गेले आहेत.सुदान मध्ये उंटांची शेतीही केली जाते. लष्करात उंटांचा वापर करून घेतला जातो.उंटाचा प्रमुख उपयोग वाळवंटातील वाहन म्हणून केला जातो.
* उंटांचे दूध पिण्यासाठी वापरले जाते.उंटाचे मांस खाण्यासाठी वापरले जाते तर चामडे पादत्राणे बनविण्यासाठी वापरले जाते. उंटाच्या केसांपासून काही विशिष्ट प्रकारची औद्योगिक वस्त्रेही बनविली जातात.