
सटाणा | प्रतिनिधी Satana
सप्तश्रृंगी गडावर यात्रेसाठी पायी जाणा-या द्याने ता. मालेगांव येथील 48 वर्षीय सोमनाथ देवराम पवार या भाविकाचा विहीरीत पडून मृत्यू झाला.
द्याने ता.मालेगांव येथील सोमनाथ देवराम पवार हे सप्तश्रृंगी गडावर यात्रेसाठी पायी प्रवास करीत असतांना मालेगांव-सटाणा रस्त्यावरील यशवंत नगर परिसरात रात्रीच्या वेळी विश्रांती घेण्यासाठी जागेचा शोध घेत असतांना अर्जुन महाले यांच्या धांद्री शिवारातील कठडे नसलेल्या विहीरीत पडून मृत्यू झाला.
पोलिस पाटील श्रीधर बारकु बागुल यांनी सटाणा पोलिसात घटनेची माहिती कळविली. प्रभारी पोलिस अधिकारी किरण पाटील, पोलिस अतुल आहेर, जिभाऊ पवार, योगेंद्र शिसोदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सोमनाथ पवार यांचा मृतदेह परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला. सोबत बॅग असल्यामुळे मयताची ओळख पटली असून सटाणा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सप्तश्रृंगी गडावर खानदेश परिसरातून दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी प्रवास करीत आहेत. दर्शनासाठी लवकर पोहोचले पाहिजे यासाठी काही भाविकांकडून मधल्या व नजिकच्या वाटेचा अवलंब केला जात आहे.
सप्तश्रृंगी गडाकडे भाविकांनी प्रवास करतांना मुख्य रस्त्यानेच प्रवास करावा अंधार पडल्यावर गावातील ग्रामपंचायत व मंदिराच्या परिसरात थांबा घ्यावा असे आवाहन सटाणा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.