बागलाणात लम्पीचा आणखी एक बळी

पशू मृत्यूसंख्या 8 वर; 7 पशुपालकांना अर्थसाह्य
बागलाणात लम्पीचा आणखी एक बळी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात लम्पी स्कीन आजाराचा ( Lumpy skin disease)धोका वाढत आहे. नाशिक जिल्हयातील बागलाण तालुक्यातील एका गायीचा बुधवारी (दि.6) मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 270 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. 6 लाख 71 हजार 68 (75 टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे.

राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत असताना जनावरांचे मृत्यूदेखील वाढत आहेत. त्या तुलनेत नाशिक जिल्हयात लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. जिल्हाभरात गायवर्गीय एकूण 8 लाख 95 हजार 50 जनावरे आहेत. आतापर्यंत जिल्हयात 6 लाख 71 हजार 68 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 244 पशु वैद्यकीय दावखान्यांमध्ये लसीकरण सुरू आहे.

जिल्हयातील 11 तालुक्यांमध्ये 350 बाधीत क्षेत्र असून यातील 270 जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. त्यातून 150 हून अधिक जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. लम्पीची बाधा झालेली सर्वाधिक जनावरे सिन्नर तालुक्यात आहेत. तालुक्यात तब्बल 133 जनावारांना लागन झाली आहे. या पाठोपाठ इगतपुरी 45, चांदवड 15, मालेगाव 11, बागलाण 20, देवळा 4, येवला 4, निफाड 16, नाक 4, पेठ 6 व दिंडोरी तालुक्यातील 12 जनावरांचा समावेश आहे. आतापर्यंत लागन झालेल्या जनावरांपैकी आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात सिन्नर 2, इगतपुरी 2,बागलाण 3 मालेगाव तालुक्यातील 1 जनावारांचा समावेश आहे.

पशुपालकांना मदत

जिल्हयात आतापर्यंत लम्पीने आठ जनावारांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 4 पशुपालकांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अनुदान प्राप्त झाले असून तिघांना ते लवकरच मिळणार आहे. चंद्रकांत आडोळे (बोरटेंभा, इगतपुरी) यांच्या बैलाचा मृत्यू झाला असून 25 हजारांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. विजय दत्तु जाधव (घोटी, इगतपुरी) यांच्या गाईचा मृत्यू झाला. त्यांना 30 हजार तर वाळीबा बन्सी जाधव (पाडळी, सिन्नर) व रामनाथ खंडू कराड (पाटोळे, सिन्नर) यांचे वासरू मृत्यू असून त्यांना प्रत्येकी 16 हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे. इतर तीन प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यांना मंजुरीनंतर अनुदान प्राप्त होईल.

लसीकरणावर भर

जिल्हयात लम्पी स्कीन आजार लागणीचा वेग कमी आहे. 7 जनावारांचा मृत्यू झाला आहे. मात्र लसीकरणावर भर दिला जात असून आतापर्यंत 75 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्येक गावनिहाय नकाशे करावेत. जनावरांचे पर्यवेक्षण करून उपचार करावेत. स्थानिक डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जि.प.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com