लस न घेताच प्रमाणपत्र तयार

लस न घेताच प्रमाणपत्र तयार

सिन्नर । अमोल निरगुडे | Sinnar

सध्या तालुका प्रशासनाने तालुक्यात 100 टक्के लसीकरणाचे (vaccination) उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यामूळे काही नागरिकांना लसीचा डोस (Dosage of the vaccine) न घेताच लस घेतल्याच्या संदेशासह शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर चक्क लस घेतल्याचे प्रमाणपत्र (certificate) देखील मिळत असल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुढे आला आहे.

नुकतीच तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अर्चना पठारे (Prantadhikari Archana Pathare) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय विभागातील अधिकार्‍यांची बैठक पार पडली. आगामी काळातील कोरोनाचा (corona) धोका लक्षात घेता 100 टक्के नागरीकांना लसीचे दोन्ही डोस देण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना पठारे यांनी अधिकार्‍यांना केल्या. मात्र, अंमलबजावणीच्या दिवसापासूनच तालुक्यातील

काही नागरिकांना लसीचे डोस न घेताच त्यांच्या मोबाईलवर (mobile) ‘अभिनंदन, आपल्या कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले’ असे संदेश येऊ लागल्याने नागरिकांचा गोंधळ उडत आहे. यानंतर मोबाईलवर प्रमाणपत्र डाऊनलोड (Certificate Download) करण्यासाठी लिंकचा दुसरा संदेश पडत असून या लिंकद्वारे ‘कोविन डॉट इन’ या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरुन चक्क प्रमाणपत्रसुध्दा निघत आहे.

यामुळे काही नागरिकांना लस न घेताच लसीचे प्रमाणपत्र मिळत असल्याने आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. तालुक्यात 90 टक्केच्या वर नागरिकांनी लसीचा पाहिला डोस घेतला असून यापैकी अनेकांचा दुसरा डोस बाकी आहे. अशा नागरिकांना लसीचा दुसरा डोस न देताच लसीकरण पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सत्य प्रकार

तालुक्यातील विंचूरदळवी येथील दत्ता जाधव यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. जाधव हे गुरुवारी (दि. 24) सकाळी कामानिमित्त गावात गेले असताना त्यांना आपल्या मोबाईलवर ’आपल्या कोरोना लसीचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे’ असा इंग्लिशमध्ये संदेश आला. डोस घेतलेलाच नसल्याने तेही बुचकळ्यात पडले.

आपण गावात आलो असून लस देणारे आरोग्य सेवक आपल्या घरी आले असतील व त्यांनी आपल्या घरच्यांकडून माहिती घेत नोंदणी करुन लस देण्यासाठी थांबले असतील. असे त्यांना वाटले. त्यांनी घाईघाईने हातातील काम सोडून घर गाठले. मात्र, घरी कुणीच आले नसल्याचे त्यांना त्यांच्या पत्नीने सांगितले. यानंतर प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंकचाही संदेश पडला. मात्र, लस न घेताच त्यांचे लसीचे प्रमाणपत्र तयार झाल्याने त्यांचा गोंधळ उडाला. आता आपल्याला दुसरा डोस मिळेल का नाही असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

नागरिकांची सुरक्षा वार्‍यावर

सर्व शासकीय कार्यालये, खासगी अस्थापना, मंदिरे, सिनेमागृहे, दुकाने अशा गर्दी होणार्‍या ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असेल तरच प्रवेश दिला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, लस न घेताच काही नागरिकांना दोन्ही डोसचे प्रमाणपत्र मिळत असून हेच प्रमाणपत्र दाखवुन ते प्रत्येक ठिकाणी प्रवेश करु शकतात. हे इतर नागरीकांसाठी धोक्याचे ठरू शकते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com