
देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp
२५ लाखांची तडजोड रक्कम दे, नाही तर शेती व घर विकायला लावीन, अशी धमकी देऊन पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
याबाबत विठाबाई पांडुरंग बोराडे (रा. काळे वस्ती, बाजगिरा, लहवित, ता. जि. नाशिक) यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा योगेश पांडुरंग बोराडे (वय ३६) याच्याविरुद्ध त्याची पत्नी सुजाता योगेश बोराडे ऊर्फ सुजाता देवीदास वाळुंज (वय २९) हिने कोर्टात फारकतीचा दावा दाखल केला असून त्यावर प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, २५ ऑगस्ट २०१४ ते दि. १६ एप्रिल २०२३ या कालावधीत आरोपी सुजाता बोराडे, सत्यभामा देवीदास वाळुंज (दोघेही रा. बनकर मळा, सिन्नर फाटा, नाशिकरोड) व गणेश कोठुळे (वय ३२, रा. खर्जुल मळा, ता. जि. नाशिक) यांनी मयत योगेश बोराडे याच्याकडे २५ लाख रुपयांची तडजोडीची रक्कम मागितली.
ही रक्कम दिली नाही, तर तुला तुझी शेती व घर विकायला लावीन, अशी धमकी दिली. आरोपींकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून फिर्यादी यांचा मुलगा योगेश बोराडे याने आत्महत्या केली.
त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी सुजाता बोराडेसह सत्यभामा वाळुंज व गणेश कोठुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गिते करीत आहेत.