
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
नातेवाईक व ओळखीच्या मंडळी समोर पोलीस चौकी परिसरात बायकोच्या पाया पडण्यास सासूने तगादा लावल्याने अपमानित झालेल्या जावयाने गळफास घेऊन आपले जीवन संपले. उपनगर पोलिसात सासू व बायकोच्या दोन भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मयत नितीनचे वडील सोहमपाल चटोले यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, देवळाली गाव, वडारवाडी येथे राहणार्या नितीन सोहनपाल चटोले (वय30) आपली पत्नी व मुलांसोबत राहतो तर नितीनचे आई, वडील हे जयभवानीरोड येथे राहतात. पती-पत्नीमध्ये वादविवाद झाल्यास नेहा नेहमी मुलांना घेऊन माहेरी निघून जायची.
जून 2021 मध्ये नेहा अशीच माहेरी निघून गेल्यानंतर महिला सुरक्षा विभागात तक्रार दिली होती. महिला सुरक्षा विभागातील अधिकारीसमोर सासू विमलने जावई नितीनला तू आणि तुझे खानदान आमच्या मुलीच्या लायकीचे नाही. तू तुझं काही पण कर, आम्ही आमच्या मुलींचे बघून घेऊ, असे बोलून नेहाला पुन्हा माहेरी नेले. तेव्हापासून नितीन नैराश्यामध्ये राहत होता.
गेल्या गुरुवारी नितीन व नेहामध्ये सासू विमलाच्या संसारातील हस्तक्षेपावरून भांडण झाले. संतापाच्या भरात नितीनने पत्नी नेहाला चापट मारली होती. त्यावरून उपनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शुक्रवारी सायंकाळी देवळालीगावमधील सुंदरनगर पोलिस चौकी येथे नितीन, नेहा व दोघांचे नातेवाईक, ओळखीचे उपस्थित होते. यावेळी पुन्हा सासू विमलाने नितीनचा तू माझ्या मुलीसोबत राहण्याच्या लायकीचा नाही, असे म्हणत जावयाला सर्वांसमोर नेहाच्या पाय पडायला लावले होते आणि सर्वांसमोर अपमान केला.
सासू व मेहुण्याच्या छळाला कंटाळून नितीनने घरी जाऊन छताच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी नितीन वर देवळाली गाव येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीनला मानसिक त्रास देऊन सर्वांसमोर अपमान करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू विमल, मेव्हणे विकी व राहुल यांच्याविरुद्ध उपनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.