भाजीपाला दरात मोठी घसरण

मालविक्रीतून उत्पादन खर्चही निघेना
भाजीपाला दरात मोठी घसरण

निफाड | प्रतिनिधी | Niphad

यावर्षी प्रारंभीची पाणीटंचाई (Water scarcity), त्यात लांबलेला पाऊस (Rain) अन् आता दीर्घकाळ सुरू असलेली पावसाची हजेरी यामुळे शेतकरी (Farmers) मेटाकुटीला आला असतांनाच हातात आलेली टोमॅटो, सिमला मिरची, काकडी, कोबी, फ्लॉवर, मेथी, कारले आदी भाजीपाला व फळवर्गीय पिकांना भाव नसल्याने व भाजीपाला बाजारपेठेतही विक्रीसाठी नेणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या भाजीपाल्याला उकिरड्याची वाट दाखवू लागले आहे...

मागील वर्षी टोमॅटोला बर्‍यापैकी भाव असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पीक घेतले. मात्र हंगामपूर्वीच टोमॅटो 100 रु. प्रती क्रेटस् म्हणजेच 5 ते 7 रु. किलोप्रमाणे विक्री होऊ लागले आहे तर सिमला मिरची 30 रुपये प्रति क्रेटस् म्हणजेच दोन ते अडीच रु. किलोने विक्री होऊ लागली आहे.

काकडी 30 ते 40 रु. प्रति क्रेटस् तर फ्लॉवर 8 ते 10 रुपये किलोने विकली जात आहे. हिरवी मिरची 6 ते 7 रुपये, काकडी 2 ते 3 रु. किलो, कारले 2 रु. किलो याप्रमाणे घाऊक बाजारपेठेत विक्री होत असून कोथंबिर, मेथी, शेपू, पालक, मुळा, गिलके, गवार, वांगी, बटाटे यांचे ही भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहे.

या पिकांचा घाऊक भाव बघता ते विक्रीसाठीदेखील नेणे परवडेनासे झाले आहे. साहजिकच या पिकासाठी घेतलेली मेहनत तसेच खते, बियाणे, औषधे, मजूरी यांचा खर्च वाया गेला असून शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढणार आहे. गत दोन वर्ष करोनामुळे शेतीमाल विक्रीला बाजारपेठ नव्हती.

परिणामी त्यावेळी हा शेतमाल बेभावात विक्री करावा लागला. यावर्षी पीके जोमदार आली मात्र भाव पडले. शेतकर्‍याच्या कोणत्याच मालाला भाव नसतांना पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर गगनाला भिडले असून जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतींनी सर्वसामान्यांना जगणे अवघड करून ठेवले आहे.

अद्यापही अनेक शेतकर्‍यांच्या चाळीत उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. आता लाल कांदा बाजारात येण्यास काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असतांना उन्हाळ कांद्याचे भाव मात्र वाढू शकलेले नाही. दरवर्षीच शेतकर्‍यांना उन्हाळ्यात पाणीटंचाई, पावसाळ्यात अतिवृष्टी तर हिवाळ्याच्या प्रारंभी गारपीट अन् विजेचे वाढते भारनियमन या संकटांचा सामना करावा लागतो.

त्यामुळे शेतकरी हिताला प्राधान्य देत शेतीपिकांना हमीभाव देणे गरजेचे आहे. आज शेती अन् शेतकर्‍यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. कर्ज वसुलीसाठी बँका, सावकार यांचा तगादा सुरू आहे तर आहे त्या शेतीपिकाला भाव नाही. परिणामी कुटुंबाचा गाडा हाकणे देखील अवघड होऊन बसले आहे. शेतकर्‍याच्या कुठल्याही मालाला भाव नसल्याने शेतकर्‍याची अवस्था म्हणजे ‘सहन ही होत नाही अन् सांगता ही येत नाही’ अशी झाली आहे.

सिमला मिरचीला किमान 25 रु. भाव मिळावा

मी एक एकर सिमला मिरची लावली. त्यासाठी रोप, टोकर, तार, सुतळी, शेतीमशागत, औषधे, खते यावर 1 लाख 30 हजार रु. खर्च केला. आता सिमलाचे पीक जोमदार आले. मात्र आज सिमला मिरची अवघी 30 रु. क्रेटस् म्हणजेच 6 ते 7 रु. किलो प्रमाणे विकावी लागत असून यात वाहतुकीचा खर्च देखील फिटत नाही. सिमला मिरची किमान 20 ते 25 रु. किलो प्रमाणे विक्री होणे गरजेचे आहे.

- दिलीप शिंदे, शेतकरी (थेटाळे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com