सोने चांदीची झळाळी फिकी

दर गडगडले : गुंतवणुकीची संधी
सोने चांदीची झळाळी फिकी

नाशिक । प्रतिनिधी

सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. सोन्याचे भाव तोळ्याला ३ हजार रुपयांनी घसरले. तर चांदीची चमकही फिकी पडली. चांदीच्या दरात तब्बल किलोमागे १२ हजारांची घसरण झाली. गुरुवारी (दि.१३) बाजारपेठेत सोने प्रति तोळा ५५ हजार तर चांदीचा भाव प्रतिकिलो ६४ हजार रुपये इतका होता. मात्र ही सोने व चांदी खरेदी करण्याची हि संधी असल्याचे सराफा व्यावसायिक सांगतात.

करोना संकटामुळे इतर मार्केट डाऊन असले तरी सराफा बाजारात तेजी पहायला मिळाली. गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे सोन्यात व चांदीत गुंतवले. करोना संकटात सुरक्षित गुंतवणुक म्हणून लोकांनी सोन्या चांदीला पसंती दिली. जगभरात गुंतवणुकिचा हाच ट्रेंड पहायला मिळाला. त्यामुळे करोना संकटातही सोने चांदीला झळाळी मिळाली. सोन्याने तोळा पन्नास हजारांचा दर अोलांडला. मार्च अखेरीस ४६ हजार रुपये तोळा असा सोन्याचा दर होता. तर चांदी ६० हजार रुपये किलो असा दर होता. पण मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी मुळे सोन्या व चांदीच्या दराने रोज नवा उच्चांक गाठला.

अगदी तीन दिवसांपुर्वी सोने ५८ हजार रुपये तोळा इतका भाव होता. तर चांदी ७६ हजार रुपये किलो हा विक्रमी दरावर पोहचली. पण दोन दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. सोने प्रतितोळा तीन हजार तर चांदीच्या दरात किलो मागे १२ हजार इतकी घसरण झाली. गुंतवणुकदारांनी नफा कमाविण्यासाठी मोठया प्रमाणात विक्री केल्याने दर गडगडल्याचे पहायला मिळते.

विक्रीच्या माऱ्याने सोने भाव गडगडले . गेल्या 3 महिन्यापासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत होते. मात्र काल पासून नफा कमविण्यासाठी गुंतवणूकदारांनी बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री केली. त्याचा परिणाम म्हणून एकाच दिवसात सोन्याचे भाव 3 हजारा पर्यंत कोसळले. तर चांदीचे दर १२ हजार रुपयांनी उतरले. मात्र उतरते भावदेखील एक गुंतवणूकीची संधी आहे.

- चेतन राजापूरकर, अध्यक्ष, नाशिक सराफ बाजार असोसिएसन

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com