95 वर्षांच्या आजोबांनी केली करोनावर मात

इच्छाशक्तीच्या बळावर स्वत:सह कुटुंबातील चौघांना केले करोनामुक्त
95 वर्षांच्या आजोबांनी केली करोनावर मात

मनमाड । प्रतिनिधी

करोनामुळे अनेक तरुणांचा मृत्यू होत असतांना दुसरीकडे मात्र स्कोअर 12, वय 95 असताना देखील एका आजोबांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर करोनावर मात केली आहे. हा चमत्कार घडला आहे मनमाडपासून जवळ असलेल्या कर्‍ही या गावात. आजोबांनी दाखवलेले धाडस पंचक्रोशीत कौतुक व प्रेरणेचा विषय बनले आहे.

करोनाबाधित झाले असले तरी वेळेवर उपचार घेऊन डॉक्टरांनी केलेल्या सूचना व शासनाच्या नियमांचे पालन करत या आजोबांनी करोनाला चारीमुंड्या चित केले. या आजोबांसोबत त्यांच्या घरातील इतर 4 जण देखील करोनाच्या विळख्यात सापडले होते. मात्र आजोबांनी त्यांचेही धाडस वाढविल्यामुळे या सर्वांनी करोनावर मात करून करोनाला घाबरू नका असाच सकारात्मक संदेश दिला आहे.

मनमाडपासून सुमारे 7 किमी अंतरावर सुमारे दीड हजार लोकसंख्या वस्तीचे कर्‍ही गाव असून या गावात किसन लाहिरे (95), पत्नी, मुलगा, सून, नातवंडे सोबत राहतात. रोज गावातील चावडीवर मित्रांसोबत बसत असतांना त्यांना थंडी, ताप आल्याने त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी स्वॅब देण्याचा सल्ला दिला. स्वॅब दिल्यावर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेले घरातील इतर 4 जणांना देखील करोनाची लागण झाली होती.

त्यामुळे घरात चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपचारासाठी डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी शासकीय करोना सेंटरमध्ये अ‍ॅॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मात्र आजोबांनी सर्वांना धीर देत तुम्ही अजिबात घाबरू नका आपण सर्वजण बरे होऊ असे सांगत डॉक्टरांकडून घरी राहून उपचार घेतले शिवाय सर्वांनी मास्क लावणे, सॅनिटायझर नियमितपणे वापरणे यासह इतर नियमांचे काटेकोरपणे पालन केले त्यामुळे आजोबांसोबत घरातील इतर सर्व रुग्ण करोनामुक्त झाले. एकीकडे करोनाची लागण झाल्यावर धास्तीमुळे अनेकांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे मात्र धास्ती न घेता वेळेवर उपचार घेतले आणि नियमांचे पालन केले तर करोनाला हरवू शकतो हेच या 95 वर्षांच्या आजोबांंसोबत त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवून दिले.

लाहिरे काका 95 वर्षांचे असताना त्यांनी करोनावर मात केल्याचे पाहून गावातील इतर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला व त्यांचेही धाडस वाढल्यामुळे गावातील अनेकांनी करोनावर मात केली आहे.

दत्तू घुगे सरपंच-कर्‍ही

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com