मराठी साहित्य संमेलन ‘मे’मध्ये होण्याची शक्यताही धूसर

मराठी साहित्य संमेलन ‘मे’मध्ये होण्याची शक्यताही धूसर

नाशिक | Nashik

मे महिन्यात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी नियाेजन सुरु असताना कराेनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढत असल्याने आता हे संमेलन मे महिन्यात घेण्याची शक्यताही धूसर झाली आहे. हे संमेलन आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हाेण्याची दाट शक्यता आहे.

करोना रुग्णसंख्या नाशिकमध्ये वाढल्यानंतर २६ ते २८ मार्चदरम्यान नियोजित असलेले संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संमेलन मेअखेर घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मात्र सद्यःस्थिती पाहता संमेलन मेमध्ये होण्याची शक्यताही कमी आहे. संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातील मुख्य मैदानावर नियोजित आहे. संमेलन होणार, यासाठी मराठी साहित्य महामंडळ, लोकहितवादी मंडळ शेवटपर्यंत आशावादी होते.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतर साहित्य प्रेमींना मेजवानी मिळणार असल्याने अनेकांमध्ये उत्सुकता होती. स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ हे वेळोवेळी आढावा घेत होते.

तसेच लोकहितवादी मंडळाने संमेलनाच्या नियोजनासाठी ४० समित्या गठीत केल्या होत्या. त्या समित्यांच्या माध्यमातून चोख नियोजन होत होते. मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे अवघ्या काही दिवसांवर आलेले संमेलन स्थगित करण्यात आले.

स्थगित झाल्यानंतर आयोजकांनी मेच्या अखेरीस संमेलन घेण्यात येईल, तसेच १५ दिवसांनंतर संमेलनाबाबत आढावा घेतला जाईल, असे सांगितले होते. परंतु, आता रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालल्याने आता हे संमेलन सप्टेेंबर अखेरीस घेतले जाण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com