* 188 संस्थांचे अभिहस्तांतरण

* 2407 जागा अद्याप प्रलंबित

सातपूर । Satpur (प्रतिनिधी)

शहरातील हाऊसिंग संस्थांच्या इमारतीखालील 2896 जमीनपैकी अवघ्या 188 त्यांच्या मालकीच्या असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. इमारत व त्याखालील जमीन हाऊसिंग सोसायटीच्या मालकीची व्हावी, यासाठी शासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, याबाबत अनेक अडचणींमुळे घरमालकही उदासिनता दाखवत असल्याचे विदारक चित्र आहे.

इमारत अथवा त्याखालील भूखंडाची मालकी संस्थेचीच राहावी, या उद्देशाने राज्य शासनाने दि.1 ते दि. 15 जानेवारीपर्यंत विशेष मोहीम सुरू केली आहे.

जोपर्यंत इमारतीखालील जमीन गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची होत नाही, तोपर्यंत वाढलेला चटई निर्देशांक (एफएसआय), इमारतीची पुनर्बांधणी आदींसाठी संस्थेला विकासकावर अवलंबून राहावे लागते. याचमुळे चार महिन्यांच्या मुदतीत विकासकाने जमीनची मालकीही हाऊसिंग संस्थेच्या नावे करून देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

त्याच वेळी सदर जमिनीचे अधिकारी व हक्क स्वत:कडे ठेवण्यासाठी विकासकांकडून ही जमीन हस्तांतरीत करण्याला विलंब केले जाते.

यामुळे भविष्यात अनेक अडचणी संस्थेला सहन कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांच्या बाबतीत, त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण करून देण्याची तरतूद आहे.

चार महिन्यांच्या मुदतीत प्रवर्तकाने संस्थेला मालकी हक्काचे अभिहस्तांतरण करून देणे बंधनकारक असताना याबाबतची माहिती अभावी अनेक संस्थांच्या इमारती व भूखंड अनेक वर्षे उलटल्यानंतरही संस्थेच्या मालकीच्या झालेल्या नाही.

विकासकाने जर त्याची जबाबदारी पार पाडली नाही तर मात्र राज्य शासनाने 1993 सालच्या मोफा कायद्यातील तरतुदीनुसार एकतर्फी मानीव अभिहस्तांतरणाचा पर्याय देखील हाऊसिंग संस्थेला उपलब्ध करून दिला गेला आहे.

शहरातील हस्तांतरण बाकी असलेल्या 2407 संस्थांपैकी जास्तीत जास्त संस्थांकडून ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रयत्न केले जात आहेत.

शहरात अस्तित्वात असलेल्या एकूण हाऊसिंग सोसायट्या 2896 आहेत. त्यासोबतच प्लॉटेड सोसायटीची संख्या 489 आहे. तर मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्था 188 आहेत. हस्तांतरण न झालेल्या संस्थांची संख्या 2407 आहे.