बिबट्या
बिबट्या
नाशिक

दारणाखाेऱ्यांत बिबट्यांची ‘गर्दी’; महिनाभरात ९ बिबटे पिंजऱ्यात

दारणाखोरे बिबट्याचे 'हॉट डेस्टिनेशन'

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

दारणा खोऱ्यालगतच्या गावांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. जुलै महिन्यात या खोऱ्यालगत नऊ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. यामध्ये चार नर आणि पाच मादी बिबट्यांचा समावेश असून पावसाने विश्रांती घेतल्याने सावज व पाण्याच्या शोधात निघालेले बिबटे पिंजऱ्यालगतच्या भक्ष्यावर ताव मारण्याच्या प्रयत्नात कैद होत असल्याचे स्पष्ट हाेत आहे. यामुळे दारणाखाेरे बिबट्यांचे ‘हाॅट डेन्स्टिनेशन’ ठरत असल्याचे बाेलले जात आहे.

दारणाखोरे लगतच्या गावांमध्ये एप्रिलपासून बिबट्यांच्या आठ हल्ल्यांत चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील नरभक्षक बिबट्या ओळखण्याची कार्यवाही सुरू असून हैदराबाद येथील (सीसीएमबी) जीवविज्ञान प्रयोगशाळेने हल्लेखोर बिबट्या नर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पकडलेल्या चार नर बिबट्यांपैकी हल्लेखोर कोणता हे ओळखण्याच्या कार्यवाहीला वेग आला आहे.

दरम्यान, जुलैच्या सुरुवातीपासून पाऊस नसल्याने शेतमळ्यालगच वन्यजीवांची हालचाल वाढली आहे. बिबट्याचे मार्ग ओळखून त्याच भागात पिंजरे लावल्याने गेल्या काही दिवसांत त्यांचे जेरबंद होण्याचे प्रमाण वाढल्याचे नाशिक पश्चिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले. त्यांची रवानगी थेट बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात येत आहे.

नाशिक पश्चिम व सिन्नर वनपरिक्षेत्रात पकडलेले बिबटे

तारीख ठिकाण नर/ मादी

२ जुलै - जाखोरी - प्रौढ मादी

१३ जुलै - सामनगाव - मध्यम वयाचा नर

२१ जुलै - पळसे - दीड वर्षाची मादी

२४ जुलै - चाडेगाव - तीन वर्षांची मादी (विहिरीतून रेस्क्यू)

२९ जुलै - धोंडीरोड - दहा वर्षांचा नर

३० जुलै - चांदगिरी - दीड वर्षांची मादी

२२ जुलै - चिंचोली (सिन्नर) दीड वर्षाचा नर

२७ जुलै - घोरवड ( सिन्नर) तीन वर्षांची मादी

३१ जुलै - चिंचोली (सिन्नर) सहा वर्षांचा नर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com