सप्तशृंगीगड । Saptsrungi

कळवण तालुक्यातील वीज विद्युत वितरण विभागाचे कोट्यवधींचे बिल ग्राहकांकडे थकीत असल्याने महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील ग्राहकांना बिल भरण्यासाठी तगादा लावला आहे. तालुक्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्राचे अंदाजे 12 हजार ग्राहकांचे 4 कोटी तर कृषी ग्राहकांकडे 84 कोटी 30 लाख असे 88 कोटी 30 लाख रुपयांचे बिल तालुकावासियांकडे थकीत आहे.

कळवण तालुक्यातील 750 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यात महत्वाचे म्हणजे तालुक्यात 73 वीज चोरी करणाऱ्यांवर कार्यवाही करून त्या नुसार 6 लाख 5 हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.

तालुक्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषीच्या एकूण वीज ग्राहकांच्या थकबाकीचा आकडा कोट्यावधीच्या घरात गेला असून वीज बिल भरण्यासाठी मात्र वीज ग्राहकांना आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्षभरात करोनाचा प्रादुर्भाव आणि थांबलेले आर्थिक चक्र, लॉकडाऊन असल्याने सर्व स्तरातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

वीज ग्राहकांना गेली कित्येक महिने वीजबिल भरता आले नसल्याने वीज बिलाची थकबाकीही वाढली.परिणामी वीजजोडणी खंडितच्या कार्यवाहीला महावितरणकडून वेग आला आहे. तालुक्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना वीज तोडणीसारख्या कार्यवाहीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

कळवण तालुक्यातील एकूण कृषी शेतकरी वीज ग्राहक 28 हजार असून महावितरणचे कृषी ग्राहकांकडे 84 कोटी 30 लाख वीज बिल अद्याप बाकी असल्याने विद्युत वितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बिल वसुली करण्यासाठी चांगलीच मेहनत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कुठेही कृषी पंपाची वीज खंडित केली नसल्याची माहिती महावितरण विभाग कळवणतर्फे देण्यात आली आहे.

तालुक्यातील 14345 कृषी ग्राहकांचे वीज बिल थकीत असून 1781 कृषी ग्राहकांनी कृषी योजनेचा लाभ घेऊन 31 मार्च 2022 च्या आतील थकीत वीज बिलांना कृषी ग्राहकांनी 50 टक्के वीजबिल भरणा करून योजनेची सवलत घेतली आहे. या योजनेचा लाभ घेऊन 1447 कृषी ग्राहकांनी पूर्णपणे वीज बिल भरले असून निरंक झाले असल्याने विद्युत वितरण विभागाने कृषी ग्राहकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार व अभिनंदन केले.

सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित थकबाकी माफ होत असून वीजबिल कोरे झाल्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना महावितरण तर्फे देण्यात आले असल्याने थकीत वीजबिल भरण्यासाठी शेतकरी वर्ग पुढे येऊन सवलतीचा लाभ घेत आहेत. तसेच महावितरणकडून सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आव्हान करण्यात येत आहेत.

माफ होण्याच्या अपेक्षेवर बील भरलेच नाही

गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा शासनाच्या खोट्या अाश्वासनावर विश्वास ठेवून बिल माफ होईल या अपेक्षेवर भरलेच नाही. त्याची रक्कम आता लाखोंच्या घरात गेली आहे. शासनाने शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून दोन महिन्यांपूर्वी कृषी धोरण-२०२० या योजनेखाली पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक बिलात सूट देण्याची योजना अमलात आणली. त्याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही.

त्यात राज्य सरकार कधी वीज तोडू नका, तर कधी सर्वांना वीज बिल भरावे लागणार आहे, अशा धरसोड वृत्तीमुळे शेतकरी व अधिकारी, कर्मचारी सर्वजण संभ्रमात होते. गेल्या वर्षभरात कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी पावसाने तसेच गारपिटीने शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले असताना वीज बिलाचा मोठा धक्का राज्य सरकारने दिला आहे. अश्या परिस्थितीत थकीत बिल भरायचे कसे हा प्रश्न शेतकरी राजाला पडला आहे.